![]()
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत हिच्या कारला सातारा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. आगामी ‘कपबशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे येथून सांगलीकडे जात असताना हा अपघात घडला. सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने पूजा सावंत आणि इतर सहकारी कलाकार सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सावंत आणि अभिनेता ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कपबशी’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्व कलावंत गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील विविध शहरांत प्रवास करत आहेत. गुरुवारी (४ जून) पुणे येथून सांगलीकडे जात असताना काशीळ गावाच्या शिवारात तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. यातील एका कारमधून पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे प्रवास करत होते. गाडीचे मोठे नुकसान, कलाकार सुखरूप या अपघाताची भीषणता मोठी होती. समोर आलेल्या फोटोंमध्ये पूजा सावंत प्रवास करत असलेल्या कारचे आणि इतर वाहनांचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुदैवाने, या अपघातात कोणालाही गंभीर किंवा जीवघेणी दुखापत झालेली नाही. मात्र, अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता ऋषी मनोहर यांना मुकामार लागला आहे. गाडीतील सर्वजण सुखरूप असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट हा अपघात नेमका कसा झाला, चालकाचे नियंत्रण सुटले की समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा प्रकार घडला, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. १९ जूनला ‘कपबशी’ होणार रिलीज पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कपबशी’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक कौटुंबिक आणि मनोरंजक चित्रपट असून यामध्ये पूजा आणि ऋषी यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात ऋषी मनोहर हा नवा चेहरा पदार्पण करत आहे. या अपघाताच्या बातमीनंतर पूजा सावंतच्या चाहत्यांकडून ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे.
Source link
अभिनेत्री पूजा सावंतच्या कारला भीषण अपघात:तीन वाहने एकमेकांवर आदळली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना घटना