![]()
तपोवन आश्रमाच्या मागील जंगल परिसरात आढळलेल्या जळालेल्या तरुणीच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. मात्र डीएनए अहवालातून हा मृतदेह काजल इंगळे याच तरुणीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पोलिस आयुक्तालयातील सहा स्वतंत्र पथके युद्धपातळीवर तपास करत आहेत. दरम्यान काजलचा २३ जून रोजी विवाह होणार होता, अशी माहीतीसुध्दा पोलिस तपासात समोर आली आहे. काजल इंगळे ही चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोळी येथील रहिवासी होती. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ती मार्डी मार्गावरील गोळे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अटेंडंट म्हणून कार्यरत होती. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तिने नोकरी सोडली होती. यानंतर राजुरा परिसरातील तिची भाड्याची खोलीही रिकामी करून ती गावाकडे आई-वडिलांसोबत राहत होती. दरम्यान ३० मे रोजी काजल राजुरा भागात राहणाऱ्या तिच्या मावशीकडे आली होती. रात्री तेथे मुक्काम केल्यानंतर ३१ मे रोजी दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास ती मावशीच्या घरातून बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिचा शोध सुरू असतानाच २ जून रोजी दुपारी तपोवन सेवाश्रमाच्या मागील जंगल परिसरात एका तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांसह पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांचा आधार घेत तपास सुरू केला. विशेष म्हणजे, काजलचा २३ जूनला विवाह होणार होता. तिच्या विवाहाची नोंदणीही झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी तिची हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली, हा तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ४० जणांची चौकशी केली असून, संशयाच्या आधारे तीन ते चार जणांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणांनी घटनास्थळाच्या दोन किलोमीटर परिसरातील तब्बल ९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. गाडगेनगर पोलिसांसह गुन्हे शाखेची पाच स्वतंत्र पथके गेल्या सहा दिवसांपासून दिवस-रात्र तपास करत आहेत. मात्र आठ जूनच्या रात्रीपर्यंत तरी मारेकरी कोण, याबाबत पोलिसांना निश्चित धागादोरा मिळालेला नव्हता. डीएनए अहवालामधून मृतदेहाची ओळख निश्चित तपोवन परिसरातील जंगलात २ जूनला आढळलेल्या जळालेल्या मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांनी मृतदेहातील आवश्यक घटकासह काजलच्या आई-वडिलांच्या रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. प्राप्त झालेल्या अहवालात मृतदेहातील नमुने आणि काजलच्या आई-वडिलांचे डीएनए नमुने जुळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा मृतदेह काजल इंगळे हिचाच असल्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
Source link
अमरावती खुनाचे गूढ कायम:काजलचे 23 जूनला होते लग्न; तिला कोणी, का मारले, गुंता अद्यापही कायम