![]()
अमरावती शहरालगतच्या राजुरा येथे सुरू असलेल्या ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी चालक-मालकासह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा येथील एका घरात आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकली. धाडीदरम्यान, तीन व्यक्ती मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर करून ‘खायवाडी’ आणि ‘लगवाडी’ (सट्ट्याची घेवाण-देवाण) करत असल्याचे आढळून आले. या सट्टा रॅकेटचे कनेक्शन यवतमाळ आणि पुण्यापर्यंत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी त्यांची ओळख महेश सुरेश पाटकर (३४, रा. अंबा कॉलनी, अमरावती), अभिजीत अरुण पेटकर (३६, रा. आमनेर, वरूड) आणि सागर रामकृष्ण निंबर्ते (३०, रा. सावता मैदान, बडनेरा) अशी पटवली. त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये सट्ट्याचे व्यवहार, ‘खायवाडी’ आणि ‘लगवाडी’चे रेकॉर्डिंग तसेच बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आढळले. आरोपींकडून ९ मोबाइल, २ लॅपटॉप, रजिस्टर आणि इतर साहित्य असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, दीपक सुंदरकर, सुनील लासुरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजीक रायलीवाले आणि योगेश पवार यांनी केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी सट्ट्यासाठीची आयडी यवतमाळ येथील रितेश जोशी याच्याकडून घेतल्याचे आणि सट्ट्याची ‘उतारी’ पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भूत उर्फ अग्रवाल यांना देत असल्याचे सांगितले. त्यानुसार, रितेश जोशी आणि गणेश उर्फ परेश मोहन भूत यांचा शोध पोलीस घेत आहेत.
Source link
अमरावतीत ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर धाड, तिघे ताब्यात:५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवतमाळ-पुण्यातही कनेक्शन उघड