Headlines

अमरावती जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल:उष्णतेमुळे 21 एप्रिलपासून सकाळी 7 ते 10 पर्यंतच वर्ग




अमरावती जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या संदर्भात आदेश जारी केला असून, त्यानुसार २१ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते १० या वेळेतच भरतील. हा आदेश अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळांना लागू असेल. विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात, गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हा आदेश २१ एप्रिलपासून पुढील १० दिवसांसाठी लागू राहील, त्यानंतर बहुतेक शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे. सकाळी १० नंतर कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात असाव्यात, अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली होती. यापूर्वी २० मार्चपासून दुपारच्या शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरुवात झाली होती, परंतु त्यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळा घोषित केल्या होत्या, ज्यामुळे काही ठिकाणी दुपारी १२ वाजेपर्यंत वर्ग सुरू होते. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून सकाळी ७ ते १० अशी एकसमान वेळ निश्चित केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *