Headlines

दर्यापूर न्यायालयासमोरील झाडाखाली व्यक्तीचा मृतदेह आढळला:उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय, तपास सुरू




दर्यापूर येथील न्यायालयासमोर सोमवारी सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख दादाराव नकुल शिवरकर (वय ३५, रा. समता नगर, दर्यापूर) अशी पटली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाराव शनिवारपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लेटलेट्स कमी झाल्याने उपचार घेत होते. सोमवारी दुपारी ते कोणालाही न सांगता उपजिल्हा रुग्णालयातून निघून गेले. कडाक्याच्या उन्हामुळे ते दर्यापूर न्यायालयासमोर असलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली बसलेले काही नागरिकांना दिसले. आजूबाजूच्या रहिवाशांनी त्यांना पाणीही दिले होते. त्यावेळी त्यांनी ‘जास्त ऊन असल्यामुळे मी आराम करतो’ असे सांगितले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दादाराव यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसली नाही, त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी तात्काळ दर्यापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून डॉक्टरांच्या मदतीने तपासणी केली असता, डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आणि घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले होते. डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. दादाराव शिवरकर यांचा मृत्यू उष्माघातानेच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहित सोनटक्के आणि जमादार दिलीप चव्हाण करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *