![]()
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे गझलकारा अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. जोशी यांनी गझल लेखनात आकृतीबंधाबरोबरच आशय आणि शब्दांचा ओलावा असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९) पार पडला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर, मैथिली आडकर आणि प्रज्ञा महाजन या प्रसंगी मंचावर उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी गझल लेखनावर मार्गदर्शन करताना सांगितले की, गझल लिहिताना आकृतीबंधाचा विचार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे लिखाणात आशय आणि शब्दांचा ओलावा असावा. गझल लेखनात आचारसंहिताही पाळली गेली पाहिजे. उत्तम गझल निर्मितीसाठी तंत्र, प्रतिभा आणि अनुभव यांचा मिलाफ आवश्यक असतो. सुरुवातीस तंत्र, नंतर स्वत:तील प्रतिभेचा शोध आणि अनुभव अशा प्रक्रियेतून आतून उमलून आल्यानंतर उत्तम गझलेची निर्मिती होते, असे त्यांनी नमूद केले. कसदार लेखनासाठी पुनर्लेखन अत्यंत आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. लोकांतात समाजदर्शन घडते तर एकांकात आत्मदर्शन घडते, असेही ते म्हणाले. ज्या वेळेला आत्मदर्शन आणि समाजदर्शन एकरूप होते, त्या वेळेला अप्रतिम गझलेची निर्मिती होते. उत्तम कलाकृतींचे सृजन व्हावे आणि दुय्यम कलाकृतींचे हनन व्हावे यासाठी संपादन व समीक्षण होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज साहित्य क्षेत्रात समीक्षकांची वानवा असून समीक्षेचे अध:पतन म्हणजेच साहित्य क्षेत्राचे अध:पतन होय, असे प्रा. जोशी म्हणाले. गझलकारांमध्ये आढळणारा मोकळेपणा कवींमध्ये दिसून येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ॲड. आडकर यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून सहकाऱ्याच्या स्मृती जपून ठेवण्याचे उदात्त कार्य केले आहे. दीपक करंदीकर हे साहित्याच्या सर्व प्रांतात लीलया संचार करणारे, संस्थात्मक कार्य करत लेखन व सादरीकरण करणारे उत्तम व्यक्तिमत्त्व होते, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिता पैठणकर म्हणाल्या की, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कवितेने मला साथ दिली तर गझलेने जगण्याचे भान दिले. गझलेतून व्यक्त होत मानसिकदृष्ट्या सबल झाले. कविता आणि गझल माझ्या जगण्याचे स्फुरण आहेत. हा सन्मान माझ्यासाठी एक जबाबदारी असून लेखनात नाविन्य ठेवण्याचा प्रयत्न करेन. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली आणि दीपक करंदीकर यांच्यासमवेतच्या मैत्रीचा धागा उलगडला.
Source link
अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार:प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, गझलेत आशय आणि शब्दांचा ओलावा महत्त्वाचा