![]()
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आम्ही कोणतेही तोडकाम करत नाही, जोडकाम करतो,” असे सांगत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांमागे विकासाचा अजेंडा असल्याचा दावा केला. ‘सहा खासदारांनंतर सचिन अहिरांचा षटकार’ पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले, “नुकतेच सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज सचिन अहिर यांनीही आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक सहा मतदारसंघांमध्ये जाऊन आले आणि त्यांचे सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केले आहे. खरं तर चौकार-षटकार सुरूच राहतील आणि समोरच्यांच्या विकेट्स पडतच राहतील.” ‘ग्रासरूटचा नेता शिवसेनेत’ सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “सचिन अहिर हे माजी राज्यमंत्री आहेत. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी मोठे काम केले आहे. विविध कामगार संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. मुंबईतील भूमिपुत्र, कोळीवाडे आणि स्थानिकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. ते ग्रासरूट स्तरावर काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाने शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.” एकनाथ शिंदे म्हणाले, सचिन अहिर यांनी आज विधानसभा उपसभापती पदाचा फॉर्म भरला आहे, महायुतीचा फॉर्म भरला आहे. महायुती आज बहुमतात आहेत. त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्या त्यांची निवड होईल आणि ते फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रात उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील. ते आल्यामुळे शिवसेनेची देखील ताकद वाढली आहे. कामगार क्षेत्र असेल, मुंबई असेल पुणे असेल, त्यांनी जिथे काम केले आहे तिथे ताकद वाढेल. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या पक्षात त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. 2022 ला देखील बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचा विचार पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता, 30 जून 2022 रोजी मी शपथ घेतली होती आणि आजही 30 जून आहे, हा योगायोग आहे. सुरुवातील मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही टीम म्हणून काम केले. पायाभूत सुविधांचा विकास केला. महाराष्ट्र जीडीपीमध्ये नंबर एक झाला आणि महाराष्ट्र वेगवान गतीने धावू लागला. आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो आहोत एकनाथ शिंदे म्हणाले, या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि आमची घोडदौड सुरूच आहे. आम्ही शब्दाला किंमत देणारी संघटना आहे. मागच्या आठवड्यात आपण पाहिले की 6 खासदारांनी आपल्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. शेवटी जे आपण का शिवसेनेत येतो हे प्रत्येकाने सांगितले. आपल्याला जनतेला न्याय दिला पाहिजे, ही भावना असते. आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. लोकप्रतिनिधींना काय पाहिजे? विकास पाहिजे, त्यांच्या मतदारसंघातील लोकांचा विकास करायचा असतो, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात. परंतु, लोक काय काय बोलत असतात, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे असे म्हणत असतात. मात्र ते काही असो. मी आज सचिन अहिर यांचे मनापासून स्वागत करतो. ते अष्टपैलू आहेत. बॅटिंग बॉलिंग करतात आणि आज तर गूगली टाकली आहे, असेही शिंदे यांनी यावेळी अहिर यांच्या विषयी बोलताना म्हटले.
Source link
'आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो आहोत':सचिन अहिरांचे स्वागत करत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला