![]()
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे रुग्णालय येत्या महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज करावे, असे निर्देश त्यांनी मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत मंगळवारी दिले आहे. या बैठकीत लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासह येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, नागरी आरोग्य अभियानाचे आयुक्त सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव दीपक केंद्रे, पुणे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोहगाव परिसरातील वाढती लोकसंख्या, प्रस्तावित विमानतळ विकास आणि रिंग रोड प्रकल्प विचारात घेऊन येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाची क्षमता २०० खाटांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली. आरोग्य विभागाने या मागणीबाबत सकारात्मकता दर्शवली असून, या विस्ताराचा समावेश बृहत आराखड्यात करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. दरम्यान, आमदार बापूसाहेब पठारे यांनी लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाला संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, लोहगाव उपजिल्हा रुग्णालय आणि येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथे संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करावा, असेही आदेश देण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार संरक्षक भिंत उभारणे, अतिक्रमण हटविणे, वृक्षारोपण तसेच इतर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.
Source link
आरोग्यमंत्री आबिटकर यांचे लोहगाव रुग्णालय सुरू करण्याचे आदेश:महिन्याभरात लोकार्पण; संत तुकाराम महाराजांच्या नावाची मागणी