Headlines

आवक वाढली, भावात घट:सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची घट; एकाच दिवसात 40 लाखांचे नुकसान, दिवसभरात विक्रीसाठी आले 15 हजार 757 पोते‎




या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन काही प्रमाणात शिल्लक राहिले होते, त्यांनी कापणी व काढणीचा हंगाम पूर्ण केला. दरम्यान, येत्या आठवड्यात दसरा असल्याने, त्यापूर्वी सोयाबीनची विक्री करून येणाऱ्या रकमेतून सण साजरा करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे. दरम्यान शुक्रवारपर्यंत बाजारात सोयाबीनची आवक अत्यंत अल्प होती. यंदा सुरुवातीला भाव समाधानकारक असले तरी अपेक्षित माल उपलब्ध नसल्यामुळे बाजारात मोठी आवक दिसत नव्हती. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पुन्हा सुरू झाले. या दिवशी बाजारात अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. मात्र, माल बाजारात वाढताच सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांची घसरण झाली. ऐन सणाच्या तोंडावर झालेली ही घसरण शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे. मागील आठवड्यापासून बाजारात नवे सोयाबीन विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीलाच सोयाबीनला सुमारे ६ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. हळूहळू मागील आठवड्यात दररोज किमान १०० ते १५० रुपयांची वाढ होत गेली. त्यामुळे सोयाबीन निघाल्याबरोबर शेतकरी माल बाजारात आणू लागले. रोज होणारी दरवाढ पाहता सोयाबीनचे दर ७ हजार रुपये किंवा त्याहून अधिक जातील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती. दरम्यान, शनिवार व रविवारी दोन दिवस बाजार समिती बंद राहिल्यानंतर सोमवारी बाजार सुरू झाला. या दिवशी बाजारात अनपेक्षितपणे तब्बल १५,७५७ पोते सोयाबीन विक्रीसाठी आले. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात दरात प्रतिक्विंटल सरासरी २०० ते ३०० रुपयांची घट झाली. शुक्रवारी बाजारात ६३०० ते ६८०० रुपये असणारा सोयाबीनचा दर सोमवारी थेट ६१०० ते ६५०० रुपयांवर येऊन थांबला. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बाजार सुरू झाला आणि बाजारात तब्बल १५,७५७ पोते सोयाबीन दाखल झाले. याच वेळी सरासरी २०० ते ३०० रुपयांनी भाव घसरले. या हिशोबाने पाहता, सोमवारी माल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे ३९ लाख ३९ हजार रुपयांचा थेट फटका बसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात ^शुक्रवारी बाजारात ६८०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता, मात्र सोमवारी आवक वाढताच सरासरी ३०० रुपयांची घसरण झाली. हा शेतकऱ्यांसाठी मोठा झटका आहे. आधीच नापिकी आणि अत्यंत कमी उत्पादनामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. माल बाजारात आल्यानंतर भाव कमी होणे हा प्रकार संतापजनक आहे. या समस्येवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. – प्रकाश साबळे, शेतकरी नेते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *