Headlines

इथे दुकान चालवायचे असेल तर 2 लाख द्या:खंडणी नाकारल्याने कामगाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, शिवसेना महिला नेत्याला अटक




नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून तब्बल 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे हिला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला आणि त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका महिला नेत्यालाच खंडणी प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे नवी मुंबईतील इंदिरा नगर परिसरात भंगाराचे दुकान आहे. या परिसरात जर दुकान चालवायचे असेल, तर 2 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी शिंदे गटाच्या उपजिल्हा संघटक पूजा बनसोडे हिने दिली होती. मात्र, तक्रारदाराने ही खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पूजा बनसोडेने तिचे सहकारी रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांना सोबत घेऊन थेट तक्रारदाराच्या दुकानात धाड घातली. यावेळी या सर्वांनी मिळून भंगार व्यावसायिक आणि त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मुख्य आरोपी गजाआड; चार साथीदार फरार या जीवघेण्या प्रकारानंतर पीडित व्यावसायिकाने तातडीने तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी पूजा बनसोडे हिच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील पूजाचे इतर चार साथीदार (मजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख सध्या फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. एका सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला खंडणी आणि मारहाणीच्या गुन्ह्यात अटक झाल्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *