![]()
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे विलासराव देशमुख हायस्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यार्थ्यांची पारंपरिक भक्तिमय दिंडी उत्साहात काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच वारकरी संप्रदायातील विविध पात्रांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात गावभर पदयात्रा करत संपूर्ण परिसर विठ्ठलभक्तीने भारावून टाकला. दिंडीचा समारोप श्री विठ्ठल मंदिरात झाला. यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी वारीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. वारकरी संप्रदायातील समता, बंधुभाव, भक्ती आणि संस्कार या मूल्यांची माहिती देत भारतीय संस्कृतीबद्दल आदर आणि जिव्हाळा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी विलासराव देशमुख हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या शिक्षकांच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे आणि शिस्तबद्ध सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तीभाव व्यक्त केला. त्यामुळे उपरी गाव दिवसभर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. शाळेच्या प्रांगणातून दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदंग आणि टाळ्यांच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम’, “पांडुरंग हरी’ आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या नामघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडी काढत वारकरी परंपरेचा संदेश दिला. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ नामघोषांनी परिसर दुमदुमला
Source link
उपरी गावामध्ये विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी:आषाढी वारीचे संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत; संत अन् वारकरी वेशभूषेने वेधले लक्ष