![]()
तांदलवाडी गेल्या चार-पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशांवर पोहोचला असून, याचा मोठा फटका तापी काठावरील केळीच्या बागांना बसत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे केळीची पाने होरपळून निघत असून, उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे तांदलवाडीसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तापी नदीच्या पट्ट्यातील तांदलवाडी, मांगलवाडी, बलवाडी, सुनोदा, उदळी, दसनूर, खिर्डी व ऐनपूर या शिवारात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्याच्या प्रखर उन्हामुळे या बागांचे चित्र विदारक झाले आहे. तीव्र तापमानामुळे बागांमधील आर्द्रता कमी होऊन पाने करपली आहेत. याचा थेट परिणाम केळीच्या घडांच्या वाढीवर आणि गुणवत्तेवर होत आहे. निसवलेल्या (घड बाहेर आलेल्या) बागांमध्ये उष्णतेमुळे केळीचे वजन घटत आहे. कोवळे घड सुकून काळे आणि पिवळे पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे केळीचे दांडे काळे पडणे, फळांची साल जळणे आणि घड सटकण्याच्या समस्या वाढल्या आहेत. तसेच कंबरेतून खोड मोडण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ^गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशांपर्यंत आहे. यामुळे केळी खोडांचे कंबरेतून मोडण्याचे प्रमाण वाढले आहे.कोवळे घड काळे-पिवळे पडून खराब होत आहेत. तीव्र उष्णतेमुळे होरपळलेली पाने काढून टाकावीत. बागेला पश्चिम दिशेने वारारोधक लावावे. वाढत्या तापमानाचा जो ताण केळी बागांना बसतोय त्यातून सावरण्यासाठी त्यांना थोड्याफार प्रमाणात पलाश व मॅग्नेशियम सारखे अन्नद्रव्ये द्यावे. नुकसानीची तीव्रता कमी करता येईल. - प्रेमानंद महाजन, शेतकरी, तांदलवाडी
Source link
उष्णतेच्या लाटेने होरपळल्या केळीबागा:उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता; रावेरमधील शेतकरी हवालदिल