Headlines

ऑगस्ट कोरडाच; सप्टेंबरमध्येही पावसाची प्रतीक्षा कायम:शेतकरी चिंतेत; आज मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा




ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्यानंतर आता सप्टेंबरमध्येही राज्यासह देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे खरीप पिके, धरणसाठे आणि आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये देशभरातील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबरची देशातील दीर्घकालीन सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. देशाच्या बहुतांश भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असली, तरी उत्तर-पश्चिम, ईशान्य, पूर्व आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागांत सरासरी किंवा त्याहून अधिक पाऊस होऊ शकतो. त्यामुळे पावसाचे वितरण असमान राहण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रात काही भागांत सरींची शक्यता राज्यात सध्या मॉन्सूनचा जोर ओसरला असला तरी काही भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तसेच उत्तर-मध्य महाराष्ट्र ते गुजरातदरम्यानची हवामान प्रणाली यामुळे काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. इतर भागांत ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस पडू शकतो. घाटमाथ्यावरही हलका पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात ऑगस्टमध्ये तब्बल 114 मिलिमीटर तूट ऑगस्ट महिना मराठवाड्यासह सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी विशेषतः कोरडा ठरला. मराठवाड्यात ऑगस्टमध्ये सरासरी १७० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ५६.५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे ११४ मिलिमीटरची तूट नोंदली गेली. काही भागांत सलग ३१ दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, उडीद, बाजरी आणि ज्वारीसारख्या खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. पिकांना निर्णायक टप्प्यावर पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणे आणि प्रकल्पांमधील पाणीसाठ्याबाबतही त्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत. ऑगस्ट ठरला देशातील सर्वांत कोरड्या महिन्यांपैकी एक देशभरात ऑगस्टमध्ये २१३.३ मिलिमीटर पाऊस झाला. १९०१ नंतरचा हा ऑगस्टमधील १७वा सर्वात कमी, तर २००१ नंतरचा सातवा सर्वात कमी पाऊस ठरला आहे. ३१ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार ७४१ जिल्ह्यांपैकी ३१२ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी, तर ३८ जिल्ह्यांत मोठी पावसाची तूट नोंदली गेली. सप्टेंबरच्या सुरुवातीला दिलासा मर्यादित २ सप्टेंबरपर्यंत हिमालयाच्या पायथ्यालगत आणि पूर्व-मध्य भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र द्वीपकल्पीय भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. ३ ते ९ सप्टेंबरदरम्यानही पूर्व भारत आणि लगतच्या पूर्व-मध्य भागात पाऊस चांगला होण्याची शक्यता असून, देशाच्या उर्वरित भागात तूट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तुरळक पावसाच्या सरींची शक्यता असली तरी राज्यभर दमदार पावसाचा अंदाज नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास खरीप पिकांसोबतच आगामी रब्बी हंगाम आणि पाणी नियोजनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हेही वाचा… मुंबईत-बुरखा घातलेल्या 2 महिलांना रुग्णालयाच्या गेटवर थांबवले: बुरखा काढण्याच्या मागणीवरून महिला पोलिसांशी वाद मुंबईतील बीएमसी संचालित कूपर रुग्णालयाच्या गेटवर बुरखा घालून आलेल्या दोन महिलांना रोखल्याची घटना समोर आली आहे. या महिला रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान रुग्णालयात तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आणि त्या महिलांमध्ये जोरदार वाद झाला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाने सुरक्षेचे कारण देत आणि लहान मुलांच्या चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी गेटवर प्रवेश करणाऱ्यांची ओळख पटवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *