![]()
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्यात अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. बीएमसीसी येथे हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला. या उपक्रमाद्वारे आध्यात्मिक, सामाजिक आणि साहित्यिक ज्ञानाचा डिजिटल माध्यमातून प्रसार करण्यावर भर दिला जाईल, तसेच गाणपत्य तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रचार केला जाईल. या सामंजस्य करारावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दीपक पौडेल, उपप्राचार्य प्रा. डॉ. भारती उपाध्ये, प्रा. डॉ. प्रशांत साठे, प्रा. डॉ. वर्षा देशपांडे, प्रा. डॉ. राजेश्री गोखले उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त व उत्सवप्रमुख अमोल केदारी आणि ओंकार कलढोणकर हे देखील उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञान परंपरेला अनुसरून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विविध अल्पकालीन आणि ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल. बीएमसीसी या उपक्रमासाठी शैक्षणिक व्यासपीठ म्हणून कार्य करेल. ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रमाणीकरण आणि मानकीकरण करण्याची जबाबदारी महाविद्यालयाची असेल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट समाजमाध्यमांसह विविध माध्यमांचा वापर करून आध्यात्मिक विचारांमध्ये रुची असलेल्या व्यक्तींना या अभ्यासक्रमांशी जोडेल. अथर्वशीर्ष पठणाचा हा अभ्यासक्रम बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राबवला जाईल. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे प्रमाणपत्र, तर महाविद्यालयाच्या वतीने श्रेयांक (क्रेडिट्स) दिले जातील. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अथर्वशीर्ष पठणासोबतच त्यामागील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विचारांचा सखोल अभ्यास करता येईल. या उपक्रमासाठी बीएमसीसीकडून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. स्वानंद गजानन पुंड आणि ट्रस्टकडून अध्यक्ष सुनील रासने हे समन्वयक म्हणून काम पाहतील.
Source link
बीएमसीसी, दगडूशेठ ट्रस्टमध्ये अथर्वशीर्ष पठण अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार:राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञान परंपरेला अनुसरून अभ्यासक्रमाची निर्मिती