![]()
अमरावती येथे १७ जून रोजी शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात तीव्र आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांमध्ये आंदोलकांनी मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. ‘सरकार हाय हाय’, ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलकांनी नंतर पुतळ्याचे दहन करून सरकारचा निषेध नोंदवला. हे आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून तातडीने सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. कोणत्याही जाचक अटी आणि शर्तींशिवाय राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने केवळ आश्वासने न देता शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, असा इशाराही त्यांनी दिला. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर संपूर्ण राज्यात यापेक्षाही अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल, असे शेतकरी संघटनेने स्पष्ट केले. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शेतकरी आज अडचणीत आहे आणि सरकार केवळ घोषणाबाजीत मग्न आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही.” या आंदोलनात शेतकरी संघटनेचे कपील पडघान आणि अनेक स्थानिक शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Source link
कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न