![]()
खरीप हंगाम दुष्काळाच्या झळांत होरपळला. आता ६५ हजार हेक्टरवरील रब्बी हंगामही पाण्याअभावी संकटात सापडला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा संपुष्टात आला आहे. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही झपाट्याने खालावली आहे. अशा स्थितीत पेरणी करून नंतर पिके पाण्याअभावी वाळण्याची वेळ येऊ नये. यासाठी शेतकऱ्यांनी आधी जलसाठ्याचा अंदाज घ्यावा. उपलब्ध पाण्याच्या पाळ्या लक्षात घेऊनच रब्बीचे क्षेत्र निश्चित करावे. असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. भोकरदन तालुक्यात यंदा पावसाने दीर्घ ओढ दिली. परतीच्या पावसानेही अपेक्षित साथ न दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. बी-बियाणे, खते, औषधींसह मशागतीचा खर्चही वाया गेला. ही कसर रब्बी पिकांतून निघेल, ही आशा होती. मात्र ऑक्टोबर महिना संपत आला तरीही पाऊस पडेना. रब्बीच्या पेरणीसाठी आवश्यक जमिनीतील ओलावा नसल्याने मशागतीपासून पेरणीपर्यंतची सर्वच गणिते बिघडली आहेत. त्यात भूगर्भातील पाणीसाठा घटल्याने विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणीचा खर्च करूनही ऐन वाढीच्या टप्प्यावर पाणी न मिळाल्यास संपूर्ण पीक हातचे जाण्याची भीती आहे. रब्बीचे क्षेत्र घटण्याची चिन्हे : भोकरदन तालुक्यात दरवर्षी सुमारे ६५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होते. यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हे क्षेत्र घटण्याची चिन्हे आहेत. काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या आशेवर कमी क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी केवळ अंदाजावर विसंबून पेरणी करणे धोक्याचे ठरू शकते. कारण पेरणीपेक्षा पीक काढणीपर्यंत जगवण्यासाठी पाण्याची उपलब्धता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पाणी पाहूनच पेरणीचे नियोजन करा ^सध्याचे वर्ष शेतीसाठी अत्यंत कसोटीचे आहे. शेतकऱ्यांनी विहिरीतील उपलब्ध पाण्याच्या पाळ्यांचा अचूक अंदाज घेऊनच पेरणीचे क्षेत्र ठरवावे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि उपलब्ध जलसाठ्यानुसार पिकांची निवड करावी. घाईने पेरणी करून आर्थिक नुकसान ओढवून घेऊ नये. -अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन
Source link
कृषी विभागाचा सल्ला:भोकरदनच्या 65 हजार हेक्टरवरील रब्बीला दुष्काळाचा फटका; पाणी असेल तरच पेरा, जमिनीतील ओलावा संपला, विहिरी-बोअरवेलची पातळी खालावली