![]()
पारंपरिक शेतीतील अनिश्चितता आणि अस्मानी-सुलतानी संकटांवर मात करत लाडसावंगी येथील भाऊसाहेब पडूळ आणि संतोष पडूळ या दोन बंधूंनी दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून यशाची नवी गाथा लिहिली आहे. सुलतानपूर शिवारातील गट नंबर १४ मधील आपल्या शेतीत पारंपरिक पिकांचा अट्टहास न धरता त्यांनी आधुनिक दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. आज या व्यवसायातून ते वर्षाला तब्बल ४० ते ४२ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. पडूळ बंधूंनी अत्यंत नेटके आणि आधुनिक नियोजन करून २५ एचएफ/होलस्टिन गाईंचा गोठा उभारला आहे. सध्या गोठ्यातील २५ पैकी साधारण २० गाई सतत दुधात असतात. एक गाय दिवसातून दोन वेळा मिळून दररोज सरासरी २० लिटर दूध देते. यानुसार गोठ्यातून दररोज ३०० ते ३२५ लिटर दुधाचे संकलन होते. दूध काढण्यासाठी आधुनिक मिलकिंग मशीनचा वापर केला जातो, तर गोठ्यातील शेण काढण्याच्या कष्टाच्या कामासाठी चक्क जेसीबीची मदत घेतली जाते. दुग्धव्यवसायात एकाही दिवसाची सुट्टी न घेता दोन्ही पडूळ बंधू, त्यांच्या पत्नी आणि एक मदतनीस (गडी) असे सर्वजण मिळून अत्यंत निष्ठेने या गोठ्याचे व्यवस्थापन पाहतात. दैनिक निव्वळ उत्पन्न १५,००० ते १८,००० प्रति दिवस आहे. वार्षिक उत्पन्न ४० ते ४२ लाख रुपये आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक यंत्रांची जोड भाऊसाहेब व संतोष पडूळ यांनी सांगितले की, ”दुग्धव्यवसायात सातत्य, योग्य नियोजन आणि आधुनिक यंत्रांची जोड दिली तर सुट्टी न घेता केलेल्या कष्टाचे चीज नक्कीच होते. शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास आर्थिक स्थैर्य मिळवणे कठीण नाही. लाडसावंगी येथील पडूळ बंधूंचा गोठा. ६ एकरांत चारा व खाद्य व्यवस्थापन पडूळ बंधूंनी आपल्या ६ एकर शेतीचे नियोजन दुग्धव्यवसायाला पूरक असेच केले आहे. तीन एकरांत त्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. मोसंबीच्या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गाईंसाठी लागणारा सुग्रास पशुखाद्य, मक्याचा भरडा आणि इतर मुरघास खरेदीचा खर्च भागवला जातो. ३ एकर चारा पिके : उर्वरित ३ एकर शेतीत २५ गाईंच्या दैनंदिन हिरव्या आणि वाळलेल्या वाळवैराणीची सोय केली जाते. यात मुख्यत्वे गुणवत्तापूर्ण मुरघास (Silage) बनवण्यासाठी मक्याची लागवड केली जाते.
Source link
कृषी व्यवसाय:पारंपरिक शेतीला फाटा देत वर्षाला कमावतात 40 ते 42 लाख रुपये, लाडसावंगी येथील पडूळ बंधूंचा दुग्धव्यवसायात डंका