![]()
शहरात मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहे. कामाच्या तक्रारीसाठी संबंधितांना फोन केल्यानंतर ते न उचलून टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून याचा निषेध करण्यासाठी आज (३ जुन) रोजी अधिकाऱ्यांना निवेदन व दारूची बाटली देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी व नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता काळे यांची भेट घेऊन मागील काही दिवसांपासून नागरिकांना आलेला अनुभव कथन केला. दोन दिवसांपूर्वी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत पोलवर पडून पुरवठा खंडित झाला होता. या अडचणीच्या वेळेस नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. अनेक कर्मचारी डयुटी सुरू असताना मद्यधुंद असतात असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून शहरातील नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, गंगापूर शहरातील सर्व डीपींवरील केबलचे काम तातडीने पूर्ण करावे. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी नगरसेवक अख्तर सय्यद, नगरसेवक नवनाथ कानडे, गुलाम शहा, हनिफ बागवान, अनिल चव्हाण, तुकाराम सटाले, स्वप्नील गायकवाड, आकाश बुचडे, कैलास बनकर, निलेश शेळके, किरण पोळ, गोविंद वल्ले, पवन जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Source link
गंगापुरात महावितरणच्या कामामुळे नागरीक त्रस्त:अधिकाऱ्याला निवेदनासोबत दिली दारूची बाटली