Headlines

गणिताची भीती सोडा, विद्यार्थ्यांत दडलाय संशोधक:विद्यार्थ्यांनी न भिता प्रश्न विचारावेत, प्रा. सचिन राळेगणकर यांचे आवाहन‎




कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्याची वृत्ती आवश्यक असते आणि या सर्व गुणांचा पाया गणित घालते. गणिताची भीती न बाळगता त्याचा आनंदाने अभ्यास केल्यास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संशोधक दडलेला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची सवय लावावी, असे आवाहन प्रा. डॉ. सचिन राळेगणकर यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभागात जागतिक कीर्तीचे गणितज्ञ दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त “कापरेकर कॉर्नर – ६१७४” या विशेष गणितीय उपक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. सचिन राळेगणकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन स्वप्निल कुलकर्णी होते. यावेळी मुख्याध्यापक सुनील कानडे, शारदा होशिंग, योगिता कुलकर्णी, जयश्री काळे उपस्थित होते. प्रा. राळेगणकर म्हणाले, कै. दत्तात्रेय कापरेकर यांनी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून जागतिक स्तरावर मान्यता मिळवणारे संशोधन केले. त्यांची जिज्ञासू वृत्ती, सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि ज्ञानाची ओढ ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. शाळेत उभारण्यात आलेला ‘कापरेकर कॉर्नर – ६१७४’ हा विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आकर्षण निर्माण करून नव्या संशोधनवृत्तीला चालना देणारा उपक्रम ठरेल. अशा प्रयोगशील उपक्रमांमधूनच भविष्याचे वैज्ञानिक, गणितज्ञ आणि संशोधक घडतील. यावेळी मुख्याध्यापक सुनील कानडे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच विविध गुणवर्धक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध गणितीय युक्त्या समजावून सांगत गणिताचा अभ्यास अधिक सोपा आणि रंजक कसा करता येईल याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे यांनी केले. शारदा होशिंग यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. ‘कापरेकर कॉर्नर – ६१७४’ या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी उत्सुकता, संशोधनाची प्रेरणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मोठी चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेणे महत्वाचे स्वप्निल कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेत विचार करण्याची सवय लावली तर गणित सहज आणि आनंददायी वाटेल. शाळेने सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *