![]()
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावरील प्रशासकीय कारवाई आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना ‘ईडी’कडून मिळालेली क्लीन चिट, या मुद्द्यांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. गोकुळ दूध संघ गुजरातच्या अमूलला विकण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता अटल सेतूवरून उडी मारावी, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचे कारस्थान’ गोकुळ दूध संघात सतेज पाटील गटाला मिळालेले बहुमत डावलून ५ शासकीय संचालक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर राऊत म्हणाले, “सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जनमताचा कौल फेटाळून लावला आहे. आम्ही जे म्हणतोय की लोकशाही धोक्यात आहे, ते याचसाठी. गोकुळ ही कोल्हापूरकरांची संस्था गुजरातच्या ‘अमूल’च्या घशात घालण्याचे हे कारस्थान आहे. ते उधळण्यासाठीच शेतकऱ्यांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला विजयी केले. या लोकांनी आधीच आपला ‘महानंदा’ हा ब्रँड विकला आहे, आता त्यांना गोकुळ विकायचा आहे.” ‘देवेंद्र फडणवीसांनी वडिलांच्या त्यागाचा अपमान केला’ देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, “फडणवीस इतक्या खालच्या स्तरावर जातील याची कल्पना नव्हती. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी आणीबाणीच्या विरोधात लढा दिला होता. पण देवेंद्र फडणवीस लोकशाहीने दिलेला कौल असा चिरडून टाकत असतील, तर हा त्यांच्या वडिलांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा अपमान आहे. जे लोक पराभूत झालेत, ज्यांना लोकांनी नाकारलंय, त्यांना तुम्ही शासकीय सदस्य म्हणून गोकुळवर बसवताय, हा काय प्रकार आहे? फडणवीसांनी स्वतःची प्रतिमा इतकी काळीकुट्ट करू नये की भविष्यात लोक त्यांना विसरून जातील.” तसेच, सोमवारी निघणाऱ्या मोर्चाला महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा असून, उद्धव ठाकरे यांनी स्वतः सतेज पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ‘किरीट सोमय्यांनी अटल सेतूवरून उडी मारावी’ हसन मुश्रीफ यांना ईडीने दिलेल्या ‘क्लीन चिट’वरून संजय राऊत यांनी भाजप आणि किरीट सोमय्या यांचे वाभाडे काढले. “किरीट सोमय्यांनी आता अटल सेतूच्या बांधावर उभं राहून आत उडी मारावी. आमच्या सर्वांविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही एवढी मोठी लढाई लढलात, आता लोकांना काय तोंड दाखवणार? तुमची लढाई बोगस होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावर सगळे गुन्हे माफ होतात, हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिले आहे. आता सोमय्यांनी हसन मुश्रीफांच्या दारात जाऊन उपोषण करावे. तसेच, भाजपने मुश्रीफांचा फोटो कार्यालयात लावावा आणि त्यांच्या नावाचे एक पदक किरीट सोमय्याच्या छातीवर लावावे,” अशी टीका राऊत यांनी केली. ‘शरद पवार कुठेही जाणार नाहीत’ राऊत म्हणाले, पवार साहेबांसोबत आमची सविस्तर राजकीय चर्चा झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत शरद पवार हे ‘एनडीए’सोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगतो. जशी ‘मोदी कहीं नहीं जायेंगे’ ही घोषणा आहे, तसे आमचे पवार साहेब ‘कहीं नहीं जायेंगे, हमारे साथ रहेंगे’. कोणी कितीही गमजा मारल्या तरी शरद पवार हे इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीसोबतच आहेत.” ————- हेही वाचा.. गोकुळमध्ये रडीचा डाव अन् बाहेर लोकशाही वाचवा मोर्चे: सत्तेत राहून मोर्चे काढणारा भाजप अजब पक्ष, राज ठाकरेंचा घणाघात
कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीतील राज्य सरकारच्या हस्तक्षेपावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत सडकून टीका केली आहे. “खालपासून वरपर्यंत सत्तेत असूनही ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढणारा भाजप हा जगातील एक अजब पक्ष आहे,” असा टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी गोकुळमधील भाजपच्या ‘रडीच्या डावा’चे वाभाडे काढले आहेत. सविस्तर वाचा
Source link
गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा डाव:फडणवीसांनी वडिलांच्या त्यागाचा अपमान केला, संजय राऊतांचा घणाघात; किरीट सोमय्या, मुश्रीफांनाही टोला