Headlines

गल्ले बोरगाव शाळेला सभापती खंडागळे यांची भेट‎:शाळेमधील सोयी-सुविधांसह विविध उपक्रमांची केली पाहणी




गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूलला पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई खंडागळे आणि पंचायत समिती सदस्या योगिताताई बरडे यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या विविध मूलभूत सोयी-सुविधांची बारकाईने पाहणी केली. तसेच शाळेत सद्यस्थितीत सुरू असलेल्या एसआरआय कॅम्पला भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शक सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासोबतच त्यांना शाळेत दर्जेदार आणि हक्काच्या सोयी-सुविधा मिळणे गरजेचे आहे, या उद्देशाने सभापती सुनिताताई खंडागळे व सदस्या योगिताताई बरडे यांनी शाळेतील वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि क्रीडांगण यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शाळा प्रशासनाशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आवश्यक त्या भौतिक सुविधा तातडीने पुरविण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. गल्ले बोरगाव शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सभापती सुनिताताई खंडागळे यांनी यावेळी बोलताना दिली. याप्रसंगी माजी उपसभापती संतोष राजपूत, राजेंद्र बढे, अरुण पाटे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश खंडागळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिलीप देव्हारे यांची उपस्थिती होती. गल्ले बोरगाव जि. प. शाळेला सभापती खंडागळे यांनी भेट दिली. एसआरआय कॅम्पच्या कामकाजाची घेतली माहिती शाळेमध्ये सुरू असलेल्या एसआरआय कॅम्पच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी हा कॅम्प अत्यंत महत्त्वाचा असून, शिक्षकांनी यामध्ये अधिक प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्याध्यापक सुशीलदास वैष्णव, केंद्रप्रमुख तुकाराम हार्दे, मुकेश राजपूत, अनिल देव्हारे, बाबासाहेब वीर, संदीप डोंगरे, गणेश खोसरे, संजय वीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *