![]()
हिंगोली उपविभागातील हिंगोली व सेनगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूचे वाटप केले जाणार असून लाभार्थ्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत वाळूचे परमीट घेऊन वाळू वाहतूक करता येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी शुक्रवारी ता. २४ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने अनेक ठिकाणी घरकुले अर्धवट अवस्थेत होती. त्यामुळे लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. आता पावसाळा तोंडावर येऊ लागला असून त्यापुर्वी घरकुल बांधकाम पूर्ण करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात काही लाभार्थ्यांनी वाळू बाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. लाभार्थ्यांची वाळूची अडचण लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या समितीने लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या संदर्भात घुटुकडे यांनी सांगितले की, हिंगोली तालुक्यातील कयाधू नदीच्या आमला वाळू घाटावरून २९४ ब्रास, इडोळी घाटावरून ९९ ब्रास, हिंगणी घाटावरून ६१ ब्रास, खरबी घाटावरून ७० ब्रास तर खंबाळा घाटावरून १०९ ब्रास वाळू लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहे. ता. २७ एप्रील ते ता. २९ एप्रील या कालावधीत लाभार्थ्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून परमीट घेतल्यानंतर वाळू वाटप केली जाणार आहे. या शिवाय सेनगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनीही वाळू वाटप केली जाणार असून त्या तालुक्यातील लाभार्थ्यांनी परमीट घेऊन स्वतःच्या वाहनाद्वारे वाळू वाहतूक करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी केले आहे. दरम्यान हिंगोली व सेनगाव तालुक्यातील ता. १ जानेवारी २०११ पर्यंतची शासकिय जमीनीवरील अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. यामध्ये हिंगोली शहरातील रिसालाबाजार व सेनगाव येथील इंदिरानगर भागाच्या मोठ्या पट्यातील अतिक्रमणे नियमित केली जातील. त्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे नगर पालिका प्रशासनामार्फत सादर करावीत तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रे सादर करावीत. या भागात सर्वेक्षणासाठी पथके पाठविली जाणार असून त्यानंतरच समितीच्या बैठकीत प्रकरणे ठेऊन पात्र अतिक्रमणे नियमित केली जाणार असल्याचे घुटुकडे यांनी सांगितले.
Source link
घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत:हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती