![]()
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पुणे फेस्टिव्हलच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदाला आपण निश्चित न्याय देऊ आणि पुणे फेस्टिव्हलची उंची अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर हॉटेल प्राईड येथे पुण्यातील कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी पुणे फेस्टिव्हलची अनेक वैशिष्ट्ये अधोरेखित केली. अभिनेत्री आणि नृत्यांगना खासदार हेमा मालिनी यांचा प्रदीर्घकाळ फेस्टिव्हलमध्ये नृत्याविष्कार सादर करण्याचा अनुभव कोणत्याही महोत्सवात दिसणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर पुण्यात होत राहावेत आणि कोल्हापूरप्रमाणे पुण्यातील अप्रकाशित स्थळे शोधून ती बघण्याची सुविधा निर्माण व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या बैठकीला पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुभाष सणस, सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, बालगंधर्व कार्यक्रम प्रमुख व विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर आणि सत्यशील देशपांडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. पुण्यातील नामवंत कलावंत, शिक्षण तज्ञ, साहित्यिक, कवी आणि कार्यक्रमांचे संयोजक मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले होते. यामध्ये पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, शाम भुरके, स्वाती दैठणकर, राहुल सोलापूरकर, शारंगधर साठे, राजेंद्र बर्वे, डॉ. संगीता बर्वे, हेमंत मावळे, वीरेंद्र चित्राव, राजीव बर्वे, प्रदीप निफाडकर, रघुनंदन पणशीकर, अनुराधा राजहंस, चारुशीला केळकर, सुचेता अवचट, जया जोग, ऋषिकेश देशपांडे, आभा आवटी, विजय मागीकर, सुनील महाजन, मिलिंद तुळणकर, डॉ. देविका बोरठाकुर, सचिन हिंगणेकर, निकिता मोघे, नीलिमा राडकर, धनंजय गोखले यांसह ५० हून अधिक कलावंतांचा समावेश होता. प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर होणारा यंदाचा ३८ वा पुणे फेस्टिव्हल तेवढाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याची जबाबदारी आपल्यावर असून, नवीन कलावंत नव्या कल्पनांसह सहभागी होत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे गोयल यांनी नमूद केले.
Source link
चंद्रकांत पाटील पुणे फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष:'फेस्टिव्हलची उंची वाढेल', कलावंत बैठकीत विश्वास व्यक्त