Headlines

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दांड्याने खून; पती पोलिसांत हजर:संशयित पती पोलिस अंमलदाराला म्हणाला पत्नीला संपवून आलोय‎


.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने ४४ वर्षीय पत्नीची लाकडी दांडक्याने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कन्नड शहरातील गजानन कॉलनीत सोमवारी (१२ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता घडली. रोहिणी मुकेश कुंभकर्ण असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर संशयित पती मुकेश बाळकृष्ण कुंभकर्ण याने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि थेट कन्नड शहर पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.

रोहिणी कुंभकर्ण या गजानन कॉलनी परिसरात ब्यूटी पार्लर चालवत होत्या. त्यांचा विवाह २००३ मध्ये मुकेश कुंभकर्ण याच्याशी झाला होता. या दांपत्याला इशान (१९) आणि निशा (२२) अशी दोन मुले आहेत. ११ ऑक्टोबरच्या रात्री रोहिणी घरासमोरील दत्त मंदिरापाशी आयोजित दांडिया कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पुन्हा भांडण सुरू झाले. या वादानंतर पहाटे पाचला मुकेशने लाकडी दांडक्याने रोहिणी यांच्या डोक्यावर व तोंडावर जबर वार केले. यात गंभीर जखमी होऊन रोहिणी यांचा मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या वादानंतर पत्नीची हत्या करून संशयित मुकेश सकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून थेट कन्नड शहर पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे कार्यरत ठाणे अंमलदार बी. एम. पवार यांच्यासमोर उभे राहून, ‘अत्यंत थंड डोक्याने मी माझ्या पत्नीला संपवून आलो आहे,’ असे त्याने सांगितले. हे ऐकताच ठाणे अंमलदार क्षणभर सुन्न झाले. मागील सहा-सात महिन्यांपासून मुकेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने वाद घालत होता. या त्रासाला कंटाळून हे दांपत्य तीन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील विष्णूनगर भागात भाड्याने राहण्यास गेले होते. मात्र, तेथेही वाद सुरूच राहिल्याने ७ ऑक्टोबर रोजी ते पुन्हा कन्नड येथे परतले होते. संशयित पतीने कबुली दिल्यानंतर प्रशिक्षणार्थी डीवायएसपी आरती पवार यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळ गाठले. बेडरूममध्ये रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी कन्नड शहर पोलिसांत संशयित मुकेश कुंभकर्ण याच्याविरुद्ध कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. अधिक तपास डीवायएसपी आरती पवार करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *