.

दुष्काळी परिस्थितीचा फटका आता जनावरांच्या चारा उपलब्धतेलाही बसू लागला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजची चाऱ्याची आवक घटली असून, दुसरीकडे चाऱ्याच्या दरात ३० ते ४० टक्के पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करताना पशुपालकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे.
यंदा पावसाअभावी पंढरपूर तालुक्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे.खरिपाची कसलीच पेरणी झालेली नाही, त्यामुळे मका, बाजरी आणि इतर खरीप पिकांचा चारा उपलब्ध झालेला नाही. तर शेतातील मका, कडवळ, आणि ऊस अशा चारा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने बाजारात येणाऱ्या चाऱ्याचे प्रमाणही घटले आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने चाऱ्याचे दर वाढत असल्याचे चित्र आहे.
पंढरपूर बाजार समितीतील उपलब्ध माहितीनुसार, चाऱ्याच्या प्रकारानुसार टनामागे सुमारे चार हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत दर चालू आहेत. या दरवाढीमुळे पशुपालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होत असून, जनावरांचे संगोपन करणे अधिक खर्चिक बनले आहे. रवीवारी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ १८ टन चाऱ्याची आवक झालेली होती. तर एरवी ३० ते ४० टन हिरवा चारा आवक असते.
चाऱ्याची आवक कमी होणे आणि दर वाढणे यामुळे पशुपालकांसमोर जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थिती कायम राहिल्यास चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतीतील उत्पादन घटण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बऱ्याच कारखान्यांचे धुराडे पेटले आहे. ऊसतोड सुरू झाल्यामुळे वाडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांचा तरी चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटण्याची शक्यता आहे. हिरवा चारा कमी झाल्यानंतर दूध उत्पादनात घट होण्याची भीती आहे.