![]()
श्रीराम फायनान्स लिमिटेड आणि MUFG बँक लिमिटेड यांच्यातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक गुंतवणूक व्यवहार अखेर पूर्ण झाला आहे. भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरली आहे. या व्यवहाराअंतर्गत MUFG बँकेने श्रीराम फायनान्समध्ये सुमारे २०% हिस्सा विकत घेतला असून, प्रेफरेंशियल इश्यूद्वारे सुमारे ₹३९,६१८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतीय स्पर्धा आयोगासह सर्व आवश्यक नियामक मंजुऱ्या मिळाल्यानंतर हा व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचला. व्यवहार पूर्ण होताच बाजाराने जोरदार प्रतिसाद दिला. श्रीराम फायनान्सचा शेअर आज तब्बल १० टक्क्यांनी उसळला, ज्यातून गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास स्पष्ट झाला. दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्याची ठोस सुरुवात या भागीदारीवर प्रतिक्रिया देताना श्रीराम फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले, “हा ऐतिहासिक व्यवहार आमच्या दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्याची ठोस सुरुवात आहे. यामुळे नवनिर्मितीला चालना मिळेल, किफायतशीर व विविध स्रोतांतून निधी उपलब्ध होईल आणि जोखीम व्यवस्थापनातील जागतिक दर्जाच्या पद्धतींचा अवलंब करता येईल. या गुंतवणुकीमुळे आमचा भांडवली पाया अधिक भक्कम झाला असून, प्रमुख व्यवसाय क्षेत्रांमध्ये वेगाने वाढ साधता येईल. पुढेही जबाबदार आणि सातत्यपूर्ण वाढीवर आमचा भर राहील.” ही गुंतवणूक भारताबद्दलच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक MUFG चे अध्यक्ष आणि ग्रुप CEO जुनिची हान्झावा म्हणाले, “श्रीराम फायनान्ससोबतचे सहकार्य सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील MSME आणि रिटेल क्षेत्रात मोठी क्षमता असून, SFL मजबूत पाया असलेली संस्था आहे. ही गुंतवणूक भारताबद्दलच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आमच्या जागतिक अनुभव आणि नेटवर्कच्या जोरावर आम्ही SFL च्या शाश्वत वाढीस सक्रिय पाठबळ देऊ.” भारताच्या वित्तीय क्षेत्रातील नव्या टप्प्याची नांदी तज्ज्ञांच्या मते, या व्यवहारामुळे श्रीराम फायनान्सला जागतिक भांडवल, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याचा थेट लाभ मिळणार असून, कंपनीच्या विस्ताराला वेग मिळेल. त्याचवेळी MUFG साठीही भारतातील वाढत्या वित्तीय बाजारपेठेत मजबूत पाय रोवण्याची ही निर्णायक संधी ठरत आहे. एकूणच, हा व्यवहार केवळ गुंतवणूक नसून भारताच्या वित्तीय क्षेत्रातील नव्या टप्प्याची नांदी मानली जात आहे.
Source link
चार महिन्यात ऐतिहासिक व्यवहार पूर्ण:39 हजार कोटींची परेदशी गुंतवणूक एकाच कंपनीत, शेअर आज 10 टक्के उसळला