![]()
छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत मंगळवारी (9 जून) घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. मूळ प. बंगालचे मती शेख हे मुलगा शाहीन, अजीऊल शेख (19) यांच्यासह बाबर कॉलनीत भाड्याने राहत होते. ते बेकरीत मजुरी करत. सोमवारी रात्री सोबत जेवण करून ते झोपले. मंगळवारी सकाळी 7 वाजता मुलगा शाहीन उठून बाथरूममध्ये गेला. त्या वेळी वडील झोपलेले व भाऊ पलंगावर बसलेला होता. मात्र,15 मिनिटांत शाहीन बाहेर आला, तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. भावाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याचा शाहीनला संशय आहे. जखमी मती शेख यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संभाजीनगरात मासे विक्री दुकानावरून वाद; तरुणावर प्राणघातक हल्ला शहरात घडलेल्या दुसऱ्या घटनेत जुना बायजीपुरा भागात माशांचे दुकान लावण्याच्या कारणावरून दोन तरुणांनी एका व्यावसायिकावर हॉकी स्टीकने प्राणघातक हल्ला केला. शनिवारी (6 जून) रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी माजेद व अक्रम या दोघांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार आहेत. शाहरुख शकील खान (30) हा जखमी तरुण आहे. ऑटोचालक युसूफ खान रऊफ खान यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. युसूफ खान यांचा पुतण्या शाहरुख शकील खान हा मशिदीसमोरील कब्रस्तानाच्या भिंतीजवळ, रस्त्यालगत मासे विक्रीचा व्यवसाय करतो. तिथे दोन तरुण शाहरुखसोबत मासे विक्रीचे दुकान लावण्याच्या कारणावरून भांडण करत असल्याचे दिसले. त्या वेळी युसूफ खान आणि परिसरातील नागरिकांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शिवीगाळ केली. त्यांनी मारहाण सुरू केली. दोन्ही आरोपींनी हॉकी स्टीकने शाहरुखच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्याचे डोके फुटले. पुतण्याला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या युसूफ खान यांच्या डाव्या हातावर आणि पायावरही हॉकी स्टीकने हल्ला करण्यात आला. त्याला तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर जुना बायजीपुरा आणि जिन्सी परिसरात रस्त्यालगत बेकायदेशीरपणे गाड्या लावणे, दुकाने थाटणे, अनधिकृत व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होते. जागा पकडण्यावरून गंभीर वाद होत आहेत. गाड्या लावण्यावरूनही वाद होत आहेत. विशेष म्हणजे या वाढत्या अतिक्रमणांकडे आणि रस्त्यांवरील बेकायदेशीर बाजारांकडे मनपा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. संभाजीनगरात मद्यपीचा पोलिस निरीक्षकावर हल्ला वाळूजमधील ओॲसिस चौकात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईदरम्यान मद्यधुंद दुचाकीस्वाराने पोलिस निरीक्षकाची कॉलर पकडून मारहाण केली. 8 जून रोजी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कृष्णा गोरे असे आरोपीचे आहे. वाहतूक शाखेचे अंमलदार विकास गुमलाडू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 8 जून रोजी ओॲसिस चौकात रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी एक दुचाकी (एमएच 20 एफव्ही 4769) थांबवली. ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली असता, दुचाकीचालक गोरे याने अतिमद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दुचाकी जप्त करून चौकीकडे नेण्यास सुरुवात केली. त्या वेळी आरोपी गोरे याने आरडाओरडा करत पोलिसांकडून जबरदस्तीने दुचाकीची किल्ली घेतली. त्यानंतर तो निरीक्षक राजेश यादव यांच्या अंगावर धावून गेला. त्याने त्यांना जोरदार धक्का देऊन खाली पाडले. त्यांची कॉलर पकडली आणि मारहाण केली. यादव यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. व्हिडिओ व्हायरल करून नोकरी घालवण्याची धमकी “तुमचा व्हिडिओ व्हायरल करून नोकऱ्या घालवतो,’ अशी धमकी आरोपी कृष्णा त्र्यंबक गोरे आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी दिली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक विनोद अबूज करत आहेत.
Source link
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या:आरोपी फरार, शोधासाठी पथके रवाना