![]()
ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि जीवनाचे विविध पैलू उलगडत असताना ‘ज्ञानेश्वरी चिंतन’ या दोन ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विविध पैलू तसेच संत वाङ्मयाच्या अमृताचे वाटप होणार आहे, असे प्रतिपादन हभप भास्करगिरी महाराज यांनी केले. नेवासे येथे संतमहंतांच्या उपस्थितीत ‘श्री ज्ञानेश्वरी चिंतन – खंड १ : तत्त्वज्ञान प्रबोध’ आणि ‘खंड २ : जीवन प्रबोध’ या दोन ग्रंथांचा ग्रंथपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. डॉ. अनिल सहस्रबुद्धे आणि डॉ. दिलीप धनेश्वर यांनी संचलित केलेल्या या दोन ग्रंथांचे ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी हभप देविदास महाराज म्हस्के, उद्धव महाराज मंडलिक, योगेश महाराज पवार, गणेश शास्त्री, दिलीप महाराज महाजन, नानासाहेब जाधव, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यानंतर डॉ.अनिल सहस्रबुद्धे व डॉ. धनेश्वर तसेच त्यांच्या साधकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे संतपूजन करण्यात आले. यावेळी या चिंतन ग्रंथांतील लेखांचे लेखन व ग्रंथ सजावट करणारे ओंकार जोशी, विहा पब्लिकेशनचे श्रीपाद कुलकर्णी, मुद्रक-शोधक श्रीकांत जोशी हेही उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देविदास महाराज म्हस्के म्हणाले, संत साहित्य बदलत्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. भावी काळातील सर्व प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. ज्ञानेश्वरीचे वाढलेले महत्त्व पुन्हा एकदा जनमाणसाला संत साहित्याकडे आकर्षित करेल.” गणेश महाराज शास्त्री म्हणाले, “उपनिषद आणि वेदांमध्ये जे नाही ते देखील ज्ञानेश्वरीमध्ये आहे. भगवंतांचे विचार प्रगट करण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीद्वारे केले आहे.” यावेळी डॉ. सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक करून सदर ग्रंथ निर्मितीचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. सूत्रसंचालन सतीश मुळे यांनी केले, तर शंकरराव ठोंबरे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचे सांगता झाली. यावेळी भाविक उपस्थित होते. ज्ञानेश्वरी चिंतनाचे कार्य म्हणजे संतसेवाच : भास्करगिरी महाराज आम्ही देवदर्शन करणारे किंवा ज्ञानेश्वरीचे भक्त-वाचक आहोत; परंतु डॉ. सहस्रबुद्धे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानेश्वरीचे चिंतन केल्यामुळे ते आमच्याविषयी मोठे वाटतात. ज्ञानेश्वरी चिंतनाचे हे महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल त्यांनी सर्व संतांच्यावतीने डॉ. सहस्रबुद्धे यांचे आभार मानले.
Source link
"ज्ञानेश्वरी चिंतन'' ग्रंथांतून घरोघरी संत साहित्याचे अमृत!:ज्ञानेश्वरीमध्येच भावी काळातील सर्व प्रश्नांची उत्तरे- हभप म्हस्के, ग्रंथपूजन सोहळा उत्साहात