![]()
सर्व शाखीय माळी महासंघ, अमरावतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधणारे आ. प्रवीण पोटे यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच शेगाव नाका येथील अभियंता भवनात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेश खारकर होते. या सोहळ्यात प्रबोधनकार, गायक व भावस्वरांजली संचाचे प्रस्तुतकर्ता प्रा. मोहन इंगळे यांनी सादर केलेल्या ‘ज्योतिबांचा लढा… पेटला लढा…’ या संगीतमय कार्यक्रमाने विशेष रंगत आणली. यावेळी प्रा. मोहन इंगळे यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित विविध गीते सादर केली. “सावित्रीची असे जयंती…”, “जातीला-पातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं, शिवराय-फुले-शाहू-आंब ेडकरांनी या देशाला नटवलं…” यांसारख्या गीतांसह शूर आम्ही सरदार, जय जय महाराष्ट्र माझा, वंदे मातरम् आदी गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर आधारित ‘ज्योतिबांचा लढा… पेटला लढा…’ या क्रांतिकारी गीताने करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आ. पोटे यांनी सर्व शाखीय माळी महासंघाच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच प्रा. मोहन इंगळे यांच्या प्रबोधनपर सांगीतिक कार्याचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. कार्यक्रमास समाजबांधव व रसिक उपस्थित होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित आशयगर्भ निवेदन व गीतांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरला. कार्यक्रमाची सुरुवात निवेदिका क्षिप्रा मानकर यांच्या प्रभावी निवेदनाने झाली.
Source link
‘ज्योतिबांचा लढा…पेटला लढा’ कार्यक्रम रंगला:आ. प्रवीण पोटे यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन : मान्यवरांची उपस्थिती