Headlines

डेक्कन क्वीनचा पुणे स्थानकावर 97 वा वाढदिवस साजरा:पुणे-मुंबईला जोडणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रेल्वेचे जंगी स्वागत




पुणे-मुंबईला जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’ रेल्वेचा 97 वा वाढदिवस सोमवारी (1 जून) पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवस सोहळ्याचे नियोजन रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केले होते. उपस्थित मान्यवरांनी केक कापून हा दिवस साजरा केला. सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास केक कापल्यानंतर ही रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली आणि प्रवाशांनी जल्लोष केला. यावेळी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहेरा, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसादरम्यान बँड पथकाने सलामी दिली आणि रेल्वेच्या चालकांचा सत्कार करून त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्यात आली. यावेळी बोलताना हर्षा शहा यांनी ‘डेक्कन क्वीन’च्या इतिहासावर प्रकाश टाकला. ‘दि ग्रेट इंडिया पेनीनसुलर रेल्वे’ने 1 जून 1930 रोजी पुणे-मुंबई मार्गावर इलेक्ट्रिक, हायस्पीड, कंफर्ट, लक्झरी, डिलक्स सुविधांनी युक्त अशी ‘डेक्कन क्वीन’ रेल्वे सुरू केली होती. सुरुवातीला तिला ‘ब्लू बर्ड बेबी’ म्हणून ओळखले जात असे, नंतर ती ‘दख्खनची राणी’ म्हणजेच ‘डेक्कन क्वीन’ म्हणून प्रसिद्ध झाली. सध्या ही रेल्वे मध्य रेल्वे अंतर्गत कार्यरत आहे. हर्षा शहा यांनी सांगितले की, ‘डेक्कन क्वीन’ ही जगातील एकमेव ट्रेन आहे, जिचा वाढदिवस साजरा केला जातो. त्या स्वतः गेल्या 72 वर्षांपासून हा वाढदिवस साजरा करत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *