Headlines

पुणे विधानपरिषद:विक्रम काकडे NCPचे अधिकृत उमेदवार; दिलीप वळसे पाटील म्हणाले – कोर कमिटीचा निर्णय अंतिम, नाराजी दूर करू




पुणे, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे विधानपरिषदेसाठी विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्यासोबत सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वळसे पाटील म्हणाले की, राजकारणाची समीकरणे नेहमी बदलत असतात. पक्षाच्या कोअर कमिटीने घेतलेला निर्णय अंतिम आहे. आता पक्षाची शक्ती वाढवणे, कार्यकर्त्यांना न्याय देणे आणि निवडणुकीत विजय मिळवणे हेच महत्त्वाचे आहे. कोणी काय आरोप करतो याला महत्त्व नाही. पक्षात कोणी नाराज नाही; जर कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर केली जाईल. अर्ज माघारीनंतर खरी निवडणूक सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जय पवार यांनीही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे म्हटले असून, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि त्यात कोणतीही अडचण नाही. पूर्ण ताकदीने महायुती म्हणून लढत असून, राज्यातील सर्व जागा संख्याबळाचा विचार करता भाजप जिंकेल. मोहोळ यांनी पुढे सांगितले की, भाजपने पुण्याची जागा महायुतीमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होऊन महायुतीचाच निर्णय असेल आणि विक्रम काकडे विजयी होतील. शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे सांगितले. विविध गैरसमज पसरवले जात असले तरी त्यात काही अर्थ नाही. महायुती एकत्र लढत असून, उमेदवार कोण असावा हा त्या त्या पक्षाचा निर्णय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. संजय काकडे यांनी सांगितले की, मी आणि माझ्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही आज विधानपरिषद उमेदवारी अर्ज भरत आहोत, परंतु उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील. उमेदवारीवरून पक्षात कोणतेही गोंधळाचे वातावरण नाही; प्रत्येकजण आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न करत असतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *