![]()
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीने ‘पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते. मिलिंद लेले यांनी सांगितले की, येत्या १५ आणि १६ ऑगस्ट २०२६ रोजी या महोत्सवाचे आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्जनशीलतेला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रील आणि शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ पर्यंत आहे. इच्छुक स्पर्धकांनी गुगल फॉर्मद्वारे आपली प्रवेशिका आणि रील किंवा शॉर्ट फिल्म पाठवायची आहे. नवनवीन विषय आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृतींसह जास्तीत जास्त तरुण आणि चित्रपटप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दीनिमित्त हाती घेतलेल्या सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार, स्व-बोध आणि पर्यावरण संरक्षण या पाच विषयांचा समावेश आहे. मितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी स्पर्धेचे नियम आणि अटींबाबत माहिती दिली. रील स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये असून, रीलचा कालावधी जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये असून, फिल्मचा कालावधी जास्तीत जास्त १० मिनिटांचा असावा. अर्जासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfaGzDfyJQ_zfyM6KLojQlBfic0hO7Mi26-RHlGvZmuR8HdSg/viewform?usp=dialog ही गुगल लिंक देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ८१४९२११२९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.
Source link
RSS शताब्दीनिमित्त पुण्यात शॉर्ट फिल्म, रील स्पर्धा:दीड लाखांची बक्षिसे, 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत