![]()
ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात मंगळवारी (17 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास तुकाराम मुंडे यांच्या घरी दरोडा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण शहर तसेच समाजमाध्यमांवर मोठी खळबळ उडाली. ‘तुकाराम मुंडे’ हे नाव ऐकताच राज्याचे धडाडीचे सनदी अधिकारी (आयएएस) आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याच निवासस्थानी दरोडा पडला की काय, असा गैरसमज अनेकांचा झाला. यामुळे काही तास उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. नामसाधर्म्यामुळे गोंधळ; नेमकी घटना कोणाच्या घरी घडली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दरोडा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरी नसून, दिवा शहरातील आगासनगाव परिसरात राहणारे स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या बंगल्यात पडला आहे. तक्रारदार उद्योजकाचे नाव ‘तुकाराम मुंडे’ असल्याने आणि ते वरिष्ठ अधिकारी ‘तुकाराम मुंढे’ यांच्या नावाशी तंतोतंत मिळतेजुळते असल्याने नागरिक आणि समाजमाध्यमांवर सुरुवातीला मोठा संभ्रम निर्माण झाला होता. पहाटेच्या सुमारास बंगल्यात शिरकाव; रोख रकमेसह दागिने लंपास मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आगासनगाव येथील उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या बंगल्यात प्रवेश केला. घरातील ऐवज लांबवताना चोरट्यांनी अत्यंत सफाईदारपणे हात साफ केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून सुमारे 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. दागिन्यांसह घरातील 80000 रुपये रोख रक्कमही चोरट्यांनी चोरून नेली. मुंब्रा पोलिसांची तातडीची कारवाई; एक संशयित ताब्यात दरोड्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ आगासनगाव येथील घटनास्थळी धाव घेऊन सविस्तर पंचनामा केला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. ————————– हेही वाचा… दुष्काळ सहन करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का?: रविकांत तुपकरांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती, पीक विम्याची रखडलेली रक्कम आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचक कर्जवसुलीविरोधात शेतकरी नेते आता आक्रमक झाले आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात ‘दुष्काळ संघर्ष यात्रा’ सुरू केली असून, मंगळवारी (17 नोव्हेंबर) या यात्रेच्या 5व्या दिवशी त्यांनी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दुसरीकडे, लातूरमध्ये कर्जवसुलीच्या नावाखाली एका महिला एजंटने शेतकरी नेत्याला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली आहे, तर अकोल्यात आमदार नितीन देशमुख यांनी पीक विम्यासाठी नव्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
'तुकाराम मुंडें'च्या घरी दरोड्याच्या बातमीने उडाली खळबळ:नामसाधर्म्यामुळे संपूर्ण ठाण्यात गोंधळ; पोलिसांनी उलगडले नेमके सत्य!