Headlines

माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, रस्ता द्या हो…:रुग्णवाहिका 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्याने फुगा गिळलेल्या 20 महिन्यांच्या चिमुकल्याचा आईच्या कुशीतच अंत




रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ वाहतूक नियोजनामुळे एका निष्पाप जीवाला आपले प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात घडली आहे. खेळता खेळता फुगा गिळल्याने श्वास कोंडलेल्या 1 वर्ष 8 महिने (20 महिने) वयाच्या चिमुकल्याला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीत तब्बल 1.5 ते 2 तास अडकून पडली. “माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या हो…” असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश हतबल आई-वडील करत राहिले; मात्र, पुढे जाण्यास इंचभरही जागा न मिळाल्याने उपचाराला उशीर झाला आणि त्या चिमुकल्याने आईच्या कुशीतच प्राण सोडले. आरांश सुशील ठाकूर असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. नेमकी कशी घडली दुर्घटना? अलिबाग तालुक्यातील बामणगाव येथील नाक्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुशील ठाकूर यांना 2 मुले असून, आरांश हा त्यांचा धाकटा मुलगा होता. सोमवारी (16 नोव्हेंबर) दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास आरांश नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. खेळता-खेळता त्याने अचानक एक फुगा तोंडात घातला आणि तो गिळला. हा फुगा थेट त्याच्या घशात जाऊन अडकल्याने काही क्षणांतच आरांशचा श्वास गुदमरू लागला. मुलाची ही गंभीर अवस्था पाहून घाबरलेल्या पालकांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. रस्त्याच्या कामाचा विळखा; 2 तासांची जीवघेणी प्रतीक्षा रुग्णवाहिकेतून आरांशला रुग्णालयात नेत असताना बेलकडे ते अलिबाग दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भीषण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका पूर्णपणे अडकून पडली. रुग्णवाहिकेचा सायरन सतत मोठमोठ्याने वाजत होता आणि आरांशचे आई-वडील पोटच्या गोळ्याला मांडीवर घेऊन रस्ता देण्यासाठी जीवाच्या आकांताने विनवण्या करत होते. मात्र, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिथे कोणतीही यंत्रणा नसल्याने आणि वाहनांना बाजूला सरकण्यास जागा नसल्याने रुग्णवाहिका जागची हलू शकली नाही. दुपारी 4 वाजता रुग्णालयात पोहोचले, पण उशीर झाला तब्बल 1.5 ते 2 तासांच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर कशीबशी रुग्णवाहिकेला वाट मिळाली. अखेर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली; परंतु डॉक्टरांनी तपासणी करताच चिमुकल्या आरांशला मृत घोषित केले. ठेकेदार आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कालपर्यंत ज्या घरात चिमुकल्या आरांशच्या बोबड्या बोलांनी आणि खेळण्यांनी आनंद भरला होता, तिथे आज केवळ आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येत आहे. एक सर्वसामान्य भाजी विक्रेते असलेल्या ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर बामणगावसह संपूर्ण अलिबाग परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचे काम सुरू असताना पर्यायी वाहतूक व्यवस्था का केली गेली नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी करून संबंधित रस्ता ठेकेदार आणि जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. ———————————————- हेही वाचा… दुष्काळ सहन करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का?: रविकांत तुपकरांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती, पीक विम्याची रखडलेली रक्कम आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचक कर्जवसुलीविरोधात शेतकरी नेते आता आक्रमक झाले आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात ‘दुष्काळ संघर्ष यात्रा’ सुरू केली असून, मंगळवारी (17 नोव्हेंबर) या यात्रेच्या 5व्या दिवशी त्यांनी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दुसरीकडे, लातूरमध्ये कर्जवसुलीच्या नावाखाली एका महिला एजंटने शेतकरी नेत्याला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली आहे, तर अकोल्यात आमदार नितीन देशमुख यांनी पीक विम्यासाठी नव्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *