Headlines

पुढला बॉम्ब टाकेन तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल:300 एसआरए प्रकल्पांच्या घोटाळ्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप




मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील 2 ते 3 बिल्डरांसाठी नियमात न बसणारे तब्बल 300 प्रकल्प एसआरएमध्ये घुसवले जात असून, यातून राज्याचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. मी जेव्हा या प्रकरणाचा पुढला बॉम्ब टाकेन, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल,” असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे. बुधवारी (18 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे पत्र, रुपयाची घसरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. जुहू, वांद्रे आणि मलबार हिलमध्ये ‘झोपडपट्टी पुनर्वसन’? मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या प्रदीर्घ पत्राचा संदर्भ देत संजय राऊत यांनी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव आणून काही ठराविक बिल्डर मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अपात्र प्रकल्प एसआरएमध्ये घुसवून घेत आहेत, असे आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आलिशान भागांत घोटाळा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हे गरीब आणि झोपडपट्टीधारकांसाठी असतात. मात्र, जिथे झोपड्याच नाहीत अशा जुहू, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, मलबार हिल, पेडर रोड आणि नेपियन सी रोड यांसारख्या आलिशान भागांतील जमिनी एसआरएमध्ये घेऊन हजारो कोटींचे नुकसान केले जात आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याचा डाव अधिकारी विकत घेऊन आणि दहशत निर्माण करून हे 300 प्रकल्प रेटले जात आहेत. मुंबईत मराठी माणसाच्या वाट्याला एक इंचही जमीन राहू नये, अशी व्यवस्था मुख्यमंत्री आणि त्यांचे बिल्डर करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या प्रकल्पांना तत्काळ स्थगिती देऊन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी डोळ्यांवर 10000 रुपयांचा मफलर गुंडाळलाय मफलरच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला. “परदेशातून महागडा मफलर जरी आणला, तरी त्याची किंमत 10000 रुपये असते. मुख्यमंत्र्यांना किती मफलर हवेत, ते आम्ही देऊ. पण त्यांनी भ्रष्टाचार दिसू नये म्हणून डोळ्यांवरच मफलर गुंडाळून घेतला आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, जे मुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करायला आणि गुन्हा दाखल करायला तयार नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही त्यांनी विचारला. रुपया 99 वर घसरला; पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका देशाच्या अर्थव्यवस्थेवरून राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. एकीकडे महाराष्ट्राने केंद्राकडे मागितलेली हजारो कोटी रुपयांची मदत अद्याप मिळालेली नाही, तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 99 रुपयांपर्यंत घसरला आहे. बेरोजगारी वाढली असून शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा हमीभाव मिळत नाही. अशी परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपाईन्स दौऱ्यावर जाऊन तिरंगा उचलण्याची नाटके करत आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर 50 वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही, त्यांना आता तिरंग्याचा पुळका आल्याचे पाहून आश्चर्य वाटते, असा टोला राऊत यांनी लगावला. ‘ऑपरेशन टायगर’वरून प्रत्युत्तर उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतल्याने ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर बोलताना राऊत म्हणाले की, मंत्री कोणत्याही एका पक्षाचा नसतो; पालकमंत्री या नात्याने ते भेटले असतील, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भास्कर जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून ते निर्णय घेण्यात अपरिपक्व नाहीत. ‘ऑपरेशन 3.0’ करणाऱ्यांच्या स्वतःच्याच पोटात फुटीचा गाठ (ट्युमर) वाढत असून, सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे, असे ते म्हणाले. बाळासाहेबांचे मोठेपण कोणाच्या पोस्टवर अवलंबून नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली नाही, या भाजपच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की, कोणी समाजमाध्यमावर पोस्ट केली नाही म्हणून बाळासाहेबांचे मोठेपण कमी होत नाही. तसेच, राहुल गांधी एका विशिष्ट कारणासाठी परदेशात गेले असून पुढील 4 ते 5 दिवसांत ते भारतात परततील आणि त्यानंतर इंडिया आघाडी पुन्हा जोमाने कामाला लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ————————————————————————- हेही वाचा… राहुल गांधींच्या मैत्रीपुढे बाळासाहेबांच्या विचारांची किंमत इतकी कमी झाली का?: केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काँग्रेसच्या एकाही नेत्याने साधी आदरांजलीची पोस्ट न केल्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “राहुल गांधी आणि सोनिया गांधी तर सोडाच, पण काँग्रेसच्या एकाही नेत्याने बाळासाहेबांना अभिवादन करण्याची तसदी घेतली नाही. गांधी कुटुंबाच्या चरणी आपली राजकीय निष्ठा अर्पण करण्यात धन्यता मानणारे उद्धव ठाकरे आपल्या मित्रपक्षाला या मौनाचा जाब विचारण्याची हिंमत दाखवतील का?” असा थेट सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. समाजमाध्यमावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *