![]()
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून देशभरात वातावरण तापलेले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये त्याकाळी अतिरेक्यांनी स्थानिक नागरिकांचा मतदानाचा हक्क नाकारला होता, अगदी तसेच काम आज आपलेच सरकार करतंय की काय, असे वाटू लागले आहे,” असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित डॉ. वैदेही तामण लिखित ‘लल देद: काश्मीरची आई’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी काश्मीरची सद्य:स्थिती, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काश्मिरी जनतेच्या मनात असलेली श्रद्धा, हिंदुत्वाची खरी व्याख्या आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वारसा यावर सविस्तर भाष्य केले. काश्मीरमधील त्या कटू आठवणी आणि कुपवाड्यातील घरांत बाळासाहेबांची पूजा काश्मीरच्या विषयावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी 1979 मधील आपल्या काश्मीर अभ्यास दौऱ्याच्या आणि दहशतवादाच्या काळातील हृदयद्रावक आठवणींना उजाळा दिला. दहशतवादाच्या काळात 4 भाऊ नोकरीनिमित्त मुंबई, दिल्ली आणि परदेशात राहत होते, तर झेलम नदीकाठच्या त्यांच्या वडिलोपार्जित घराची राखणदारी करणारा एक राखणदार कुटुंबासह तिथे राहत होता. अतिरेक्यांनी येऊन घर रिकामे करण्याचा इशारा दिला, पण राखणदाराने घर सोडण्यास नकार दिला. त्यानंतर अतिरेक्यांनी घरातील पुरुष आणि महिलांना वेगळे करून पुरुषांवर गोळ्या झाडल्या आणि महिलांना घराबाहेर हाकलून दिले. स्वतःच्याच देशात घर सोडण्याची वेळ आल्यावर त्या लोकांना आधार कोणी द्यायचा, असा प्रश्न तेव्हा निर्माण झाला होता. काश्मीरमध्ये बाळासाहेबांचे पूजन अशा कठीण काळात बाळासाहेब ठाकरे काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहिले. आजही कुपवाडासह काश्मीरमधील अनेक घरांत बाळासाहेबांची केवळ प्रतिमाच नाही, तर त्यांची देव्हाऱ्यात पूजा केली जाते, असे आपण ऐकले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी अभिमानाने सांगितले. हिंदू-मुस्लिम वादातून काश्मीर तोडला लल देद यांनी काश्मीरमधील हिंदू आणि मुस्लिम समाजाला एकत्र सांधण्याचा प्रयत्न केला; मात्र आज हिंदू-मुस्लिम या विषयावरून काश्मीर तोडून टाकण्यात आला आहे. 1979 मध्ये काश्मिरी जनता ‘आप हिंदुस्तान से हो क्या?’ असा प्रश्न विचारायची आणि ‘पर्यटनाचा सगळा पैसा सरकार घेऊन जाते, आमच्या रोजीरोटीचे काय?’ अशी खंत व्यक्त करायची. दुर्दैवाने आजही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि सुरक्षेचे प्रश्न कायम आहेत, असे ते म्हणाले. तीर्थयात्रेला जाऊन संध्याकाळी ‘तीर्थप्राशन’ करणे हे हिंदुत्व नाही सध्याच्या राजकीय आणि धार्मिक ढोंगीपणावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. ते म्हणाले की, आम्ही हिंदू धर्माचे कट्टर, कडवट अभिमानी आहोत; पण आमचे हिंदुत्व हे देशप्रेमाशी निगडित आहे. सकाळी तीर्थयात्रेला जायचे आणि संध्याकाळी घरी येऊन ‘तीर्थप्राशन’ (मद्यपान) करायचे, याला काहीच अर्थ नाही. केवळ शेंडी-जानवे ठेवणे किंवा पाठांतर करणे म्हणजे पांडित्य नव्हे, तर त्याचा अर्थ समजून घेऊन आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. मंदिरातील चोरी आणि पक्षचोरीवर टोला कोणाच्या घरात चोरी केली किंवा कोणाचा पक्ष चोरला तर ते पाप असते, पण मंदिरात चोरी केली तर ते पुण्य कसे ठरते, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. तसेच, आजकाल वाट दाखवणारे गुरू कमी आणि वाट लावणारेच गुरू जास्त झाले आहेत; त्यामुळे अशा गुरूंच्या नादी न लागता स्वतःच्या मनाचा शोध घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भुकेल्याचे पोट भरणे हीच खरी पूजा प्रबोधनकार ठाकरे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या विचारांचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या परमेश्वराने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, त्यालाच आपण त्यानेच निर्माण केलेली फुले वाहतो. देवाला भूक लागत नसताना आपण त्याला नैवेद्य दाखवतो; त्यापेक्षा भुकेल्या माणसाचे पोट भरणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. पत्रिकेत मंगळ आणि मंगळावर माणूस; आधुनिक जीवनशैलीवर मिश्कील भाष्य आजच्या धावपळीच्या जीवनशैलीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या पुस्तकाचा विषय वाचायला आणि पचायला जड आहे, कारण आजच्या जगात स्वतःकडे पाहायला कोणालाही वेळ नाही. भूक लागण्यासाठी औषध, खाल्लेले पचण्यासाठी औषध, झोपण्यासाठी गोळी, उठण्यासाठी गजर आणि व्यायामासाठी मशीन लागते. एकीकडे आपण पत्रिकेत ‘मंगळ’ बघतो, तर दुसरीकडे यान मंगळावर माणूस शोधायला गेले आहे, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. आजोबांनी वडिलांना सांगितले, वडिलांनी मला आणि मी आदित्यला सांगतोय… आपल्या संत परंपरेचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण संत परंपरेत एकाही संताने स्वतःला देव मानले नाही, तर सर्वजण देवाचे सेवक होऊन जगले. बहिणाबाई चौधरींनीही ‘अरे माणसा माणसा, कधी होशील तू माणूस’ असे सांगितले आहे. दुसऱ्याचे चांगले करता आले नाही तरी चालेल, पण निदान कोणाचे वाईट तरी करू नका. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना, बाळासाहेबांनी मला आणि आता मी आदित्यला हीच शिकवण देत आहे की, जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुझ्यात जर आत्मविश्वास असेल तर तुला मरण नाही. राजकीय युत्या आणि आघाड्या होत राहतात, पण शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपले मन आणि मनाचे समाधान होय, असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. —————————————————— हेही वाचा… 20 वर्षे काँग्रेसमध्ये पदे भोगताना सावरकरांचा अपमान दिसला नाही का?: सोनिया गांधींचे पुस्तक फाडणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची अखिल चित्रेंनी काढली कुंडली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडल्यानंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. ज्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर टीका केली, त्यातील प्रमुख सूत्रधार हे स्वतः अनेक दशके काँग्रेसमध्येच कार्यरत होते, याची आठवण करून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अखिल चित्रे यांनी शिंदे गटावर जोरदार पलटवार केला आहे. समाजमाध्यम ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत चित्रे यांनी संजय निरुपम, आनंद दुबे आणि सुशिबेन शहा यांच्या जुन्या काँग्रेस कारकीर्दीचा पाढा वाचत, “राजकीय सोयीनुसार जागे होणारे हे सावरकरप्रेम आहे,” असा सणसणीत टोला लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
त्याकाळी काश्मिरात अतिरेक्यांनी मतदानाचा हक्क नाकारला, तेच काम सरकार करतंय:एसआयआर प्रक्रियेवरून उद्धव ठाकरेंचा केंद्रावर घणाघात