Headlines

थकबाकीदार ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर:महावितरणने छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल केला




महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या पाच ग्राहकांवर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्टेशन आणि पदमपुरा भागातील या ग्राहकांकडून मीटर काढल्यानंतरही थेट वीज वापर सुरू होता. महावितरणच्या रेल्वे स्टेशन शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. कनिष्ठ अभियंता रवींद्र वाघ, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बागुल, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल उबाळे, परमेश्वर नावटके, विद्युत सहायक रवींद्र चव्हाण आणि कविता तळेले यांचा या पथकात समावेश होता. त्यांनी विविध भागांत वीज ग्राहकांची तपासणी मोहीम राबवली. मामा चौकात वीजचोरी पदमपुरा येथील जगजीवन हौसिंग सोसायटीतील वीजग्राहक शारदा बाबूलाल मेहरा यांचे मीटर थकबाकीमुळे काढण्यात आले होते. मात्र, तपासणीत गजराज भक्कड हे मीटर नसतानाही थेट वीजपुरवठा वापरताना आढळले. यामुळे महावितरणचे 5,860 रुपयांचे नुकसान झाले. याच परिसरात, मामा चौकातील पांडुरंग देविदास पवार यांचेही मीटर काढलेले असताना, नरेश मंडल वीजचोरी करताना आढळले. त्यांनी 16,170 रुपयांची वीजचोरी केली. पाचही आरोपींवर गुन्हा दाखल बनेवाडी येथील गिरीधर मानसिंग राजपूत यांनी मीटर नसताना थेट वीजपुरवठा जोडला होता, ज्यामुळे 20,466 रुपयांची वीजचोरी झाली. सुयोग कॉलनीतील ईश्वर गोविंदराव सिरसाठ यांनीही मीटर नसताना थेट जोडणी करून 41,960 रुपयांची वीजचोरी केली. याशिवाय, वेदांतनगर पोलिस ठाण्याशेजारील महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये मोहम्मद नासीर यांनी शेजारच्या विद्युत खांबावरून थेट जोडणी करून 10,027 रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले. वीजचोरीची निर्धारित बिले आणि दंड भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे कनिष्ठ अभियंता रवींद्र वाघ यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात या पाचही आरोपींवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *