Headlines

दर्यापूरमध्ये वीज प्रश्नावरून नगरसेवकांचा महावितरणवर मोर्चा:अभियंत्यांच्या कार्यालयासमोर लावले 'बेशरम'चे झाड




दर्यापूर शहरात अनियमित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ‘बेशरम’चे झाड लावून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी नगरसेवकांनी थेट विद्युत वितरण कार्यालयावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरण विभाग नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसून संपर्क साधण्यासही अडचणी येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात नगरसेविका नेहा देशमुख, वंदना सोलंकी, कविता गवई, मंदा इंगळे, वर्षा बोरेकर, मुनिफा बेग यांच्यासह इतर नगरसेवक आणि नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे. नगरसेविका वंदना सोलंकी यांनी सांगितले की, गेल्या उन्हाळ्यापासून दर्यापूर शहरांमध्ये विजेचा लपंडाव वाढला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. महावितरणने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये आणि विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल. या संदर्भात सहाय्यक अभियंता (अर्बन एक) सारंग गजभिये यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून पुढील दोन ते तीन आठवडे अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घर किंवा व्यावसायिक ठिकाणांमधील कचरा डीपीजवळ किंवा विद्युत तारांच्या खाली जाळणे टाळावे, कारण अशा कृतीमुळे विद्युत पुरवठ्यात अडथळे निर्माण होतात आणि तात्पुरता वीजपुरवठा खंडित करावा लागू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *