Headlines

दहावी पास ठग बनला इस्रोचा 'वरिष्ठ शास्त्रज्ञ:विवाहाच्या आमिषाने महिलेला 26 लाखांना लुटले, येरवडा पोलिसांकडून अटक




येरवडा पोलिसांनी इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 26 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या बँक खात्यातून 21 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय 34, रा. अलिबाग, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या म्हात्रे याने स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, जयेश पाटील अशा वेगवेगळ्या नावांनी महिलांची फसवणूक केली आहे. एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची आरोपी म्हात्रेशी विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली होती. म्हात्रे याने स्वतःला अवकाश संशोधन संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याचे भासवले आणि महिलेला विवाहाचे आमिष दाखवले. त्याने तिच्या मुलीची काळजी घेण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर म्हात्रे याने महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने एका बँकेकडून 26 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज काढून ही रक्कम आरोपीला दिली. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली असता, त्याने टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासात म्हात्रे हा वेगवेगळ्या नावाने महिलांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो ठाणे जिल्ह्यातील रबाळे पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात आधीच अटकेत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ठाकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विवाहविषयक संकेतस्थळांवरून महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विवाहविषयक संकेतस्थळांवर नावनोंदणी करताना महिलांनी खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *