Headlines

दीपक कुमठेकर महावितरणच्या मुख्य अभियंतापदी रुजू:छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचा पदभार स्वीकारला; पवनकुमार कछोट यांची बदली




महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी दीपक कुमठेकर यांनी सोमवारी (२५ मे) पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नाशिक येथील महावितरणच्या नेटवर्क प्लॅनिंग सेलचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. श्री. कुमठेकर हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी विपणन व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. १९९९ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले. २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता ते मुख्य अभियंता असा प्रवास खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण करत पूर्ण केला आहे. त्यांनी कोल्हापूर, सातारा, मुंबई, नाशिक, जळगाव यांसह विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. नुकतीच श्री. कुमठेकर यांची छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी बदली झाली. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. दरम्यान, यापूर्वी या पदावर असलेले पवनकुमार कछोट यांची नाशिक येथील नेटवर्क प्लॅनिंग सेलच्या मुख्य अभियंतापदी बदली करण्यात आली आहे. मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना, श्री. कुमठेकर यांनी शहरांमध्ये क्षमता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरात १० एम.व्ही.आर. क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. तसेच, नवीन सबस्टेशन उभारणी आणि अस्तित्वातील उपकेंद्रांच्या श्रेणीवर्धनात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली, ज्यामुळे शहरांना फायदा झाला. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांच्या हस्ते पवनकुमार कछोट यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला, तर दीपक कुमठेकर यांचे स्वागत करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *