Headlines

दुचाकीस्वाराकडील 2 लाखांची रोकड लुटणारे अटकेत:कोयत्याचा धाक दाखवून लुटलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त




मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वाराकडील दोन लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नऱ्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली असून, आरोपींकडून दोन लाख रुपये रोख, दुचाकी, कोयता आणि मोबाईल असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना नऱ्हे परिसरातील एका मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत घडली होती. चोरट्यांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले आणि पसार झाले होते. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऱ्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपास पथकाला माहिती मिळाली की, लूटमार करणारे दोघे जण बाह्यवळण मार्गावरील श्री स्वामी नारायण मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून यश सतीश खवले (वय २०, रा. स्वास्तिक सोसायटी, नऱ्हे) आणि ऋषीकेश उद्धव लाखे (वय २०, रा. साई व्हिला सोसायटी, नऱ्हे) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत दोघांनी लूटमार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लुटलेली दोन लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, कोयता आणि मोबाईल असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे, नीलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *