![]()
मोहोळ मृदा व जलसंधारणाच्या प्रभावी उपाययोजनांद्वारे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने ‘खेत बचाओ अभियान २०२६’ अंतर्गत मौजे सोहाळे व शेज बाभूळगाव (ता. मोहोळ) येथे शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक, आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक डॉ. कांताप्पा खोत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. तानाजी वळकुंडे उपस्थित होते. डॉ. खोत यांनी मृदा व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना बांधबंदिस्ती, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविणे तसेच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. कृषी अधिकारी कोळेकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांसह बांधबंदिस्ती योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतीमध्ये जलसंधारणाच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास ढवळे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मृदा व जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे. भविष्यातील दुष्काळी संकटांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी गावपातळीवर मृदा व जलसंधारणाची कामे करण्याचा सामूहिक संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. पिकांचे नियोजन, वाण निवडीचे धडे कृषी विज्ञान केंद्राच्या मृद विज्ञान विषय विशेषज्ञ काजल म्हात्रे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन आणि जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. स्वाती कदम यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन आणि योग्य वाण निवडीबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. तानाजी वळकुंडे यांनी आपत्कालीन परिस्थितीत जनावरांसाठी चारा नियोजनाचे महत्त्व विशद केले.
Source link
दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाचा निर्धार:‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत सोहाळे व शेज बाभूळगाव येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण