![]()
भारतीय रेल्वेच्या मालमत्तेची चोरी करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचा रेल्वे सुरक्षा बलाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली. याप्रकरणी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीला अटक केल्यामुळे रेल्वेचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळलेच, शिवाय रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेला निर्माण झालेला संभाव्य धोकाही टळल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वे साहित्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरपीएफ (अहिल्यानगर) चे निरीक्षक बेनीप्रसाद मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ क्राईम ब्रांच सब युनिट (दौंड) चे पीएसआय एकनाथ गडधे, मुख्य आरक्षक रामनाथ केकान, कॉन्स्टेबल धनंजय यादव, दीपक कर्डीले, विशाल पायघन आणि गुलाब येवले यांच्या पथकाने दौंड हायवेवरील खडकी–चिखली गावांच्या दरम्यान सापळा रचला. पोलिसांनी संशयास्पद दोन वाहने अडवून तपासणी केली असता, त्यात रेल्वेच्या सिग्नल विभागातील महत्त्वाची सामग्री आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला तिघांना ताब्यात घेतले. यात सागर अशोक नवसारे (रा. मुळानगर, ता. राहुरी), नितीन शंकर भालसिंग (रा. वाळकी), अमोल चंद्रभान पेरणे (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या साहित्यात १२ कोर सिग्नलिंग केबल: सुमारे ३.५ किमी लांबीची, ६ कोर सिग्नलिंग केबल: ६०० मीटर, मिश्रित १२ व ६ कोर केबल: सुमारे १ किमी, जीआय पाइप: ३९ मीटर, पॉइंट मशीन (आर.एस. प्रकार): १ नग, जीएस वायर: १५० किलो, एकूण किंमत: ११ लाख ८ हजार ९१२ रुपये. या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाणे (दौंड) येथे रेल्वे मालमत्ता (अवैध ताबा) अधिनियम कलम ३(अ) आणि रेल्वे अधिनियम कलम १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ अंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई मोठी आहे.यामागे आणखी कोणाचे रॅकेट आहे का, याचा तपास सुरू आहे. रेल्वेचा वायरमनच निघाला टोळीचा ‘मास्टरमाइंड’ या चोरीच्या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, रेल्वेचाच एक कर्मचारी या टोळीला फितूर असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत विशापूर येथून चौथा आरोपी हरिराम चेतराम रायकवार (वायरमन/डेपो इंचार्ज, मूळ रा. दमोह, मध्य प्रदेश) याला अटक केली. त्यानेच कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय हे साहित्य चोरून नेण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.
Source link
दौंड हायवेवर मोठी कारवाई:11 लाखांची सिग्नलिंग सामग्री जप्त; रेल्वे मालमत्ता चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, "आरपीएफ''कडून राहुरीतील दोघांसह 4 अटकेत