Headlines

नांदेड पोलिस दलातील लिपीकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या:अनैसर्गिक संबंधांसाठी लावला होता तगादा, गुन्हा दाखल




कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील एका तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावणाऱ्या नांदेडच्या पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रविवारी ता. १९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तब्बल २२ तासांनी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील नवनाथ लाखाडे (२४) या तरुणाची नांदेड पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीक अभिषेक सातपुते याच्या सोबत मैत्री होती. मागील आठ ते दहा वर्षापासून ते चांगले मित्र होते. त्यानंतर शनिवारी ता. १८ दोघेही वडगाव येथे भेटले होते. त्यानंतर ते आखाडा बाळापूर येथे आले. सायंकाळच्या सुमारास पुन्हा वडगाव शिवारात गेले. यावेळी अभिषेक याने नवनाथ याच्याकडे अनैसर्गिक संबंध ठेऊ दे असा तगादा लावला. यापुर्वीही त्याने असा तगादा लावला होता. मात्र नवनाथ याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र शनिवारी ता. १८ अभिषेक याने सकाळपासूनच त्याच्याकडे या प्रकाराचा तगादा लावला. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून नवनाथ याने वडगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत नवनाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र जो पर्यंत अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भुमीका मयत नवनाथ याच्या कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर आज आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात महिला व पुरुषांचा जमाव एकत्र आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या पथकाने तातडीने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जाऊन जमावासोबत संवाद साधला. सायंकाळी उशीरा नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीवरून अभिषेक सातपुते याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर २२ तासानंतर मयत नवनाथ याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, एस. पी. रोहिणकर यांच्या पथकाने अधिक तपास सुरु केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *