![]()
वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या पार्टीत दारूची नशा आणि शस्त्राचा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न एका 17 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला. नागपूरच्या मानेवाडा परिसरातील अध्यापक नगर येथे दारूच्या नशेत असलेल्या एका डीजे व्यावसायिकाने बेकायदा रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यावेळी बंदुकीतून सुटलेली गोळी त्याच्याकडे काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलाच्या डोक्यात घुसली. या घटनेत अर्जुन सुनील लाडसे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शैलेश हिरामण गुल्हाने (वय 35) असे गोळीबार करणाऱ्या डीजे व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीसह घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर रंगली दारूची पार्टी मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मानेवाडा परिसरातील अध्यापक नगर येथे वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर काही तरुणांनी एकत्र येत दारूची पार्टी केली. महाल्ले सभागृहाजवळ काही जण बसून गप्पा मारत होते. यामध्ये शैलेश गुल्हाने आणि अर्जुन लाडसे यांचाही समावेश होता. शैलेश हा डीजे व्यवसाय करतो, तर अर्जुन त्याच्याकडे काम करतो. विशेष म्हणजे, अर्जुन हा केवळ 17 वर्षांचा असून अकराव्या वर्गात शिक्षण घेत आहे. पार्टीदरम्यान सर्वजण गप्पा मारत असताना अर्जुनने वर्गातील काही मुले त्याला त्रास देत असल्याची बाब शैलेशला सांगितली. यावर शैलेशने त्याला घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. याच संभाषणादरम्यान त्याने आपल्याकडे शस्त्र असल्याचा उल्लेख करत रुबाब दाखवण्यास सुरुवात केली. घरातून रिव्हॉल्व्हर आणले, हवेत झाडली गोळी अर्जुनला धीर देण्याच्या बहाण्याने शैलेशने आपल्याकडे शस्त्र असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो घरात गेला आणि तेथून रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आला. उपस्थित तरुणांसमोर त्याने रिव्हॉल्व्हर काढून हवेत एक गोळी झाडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे उपस्थित तरुणांचे लक्ष त्याच्याकडे गेले. यानंतर शैलेशने पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला गोळी सुटली नाही. त्यानंतर त्याने रिव्हॉल्व्हरची मॅगझिन काढून शस्त्र हाताळण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्याने रिव्हॉल्व्हर अर्जुनच्या दिशेने रोखले असता अचानक ट्रिगर दाबला गेला. त्यातून सुटलेली गोळी थेट अर्जुनच्या डोक्यात घुसली. काही क्षणांपूर्वी सुरू असलेल्या गप्पा आणि पार्टीचे वातावरण क्षणार्धात बदलले. अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच उपस्थित तरुणांमध्ये एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्जुनला एम्समध्ये दाखल गोळी लागल्यानंतर अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. अवघ्या 17 वर्षांच्या अर्जुनच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारचे पथक आणि हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू करून शैलेश गुल्हाने याच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांना ताब्यात घेतले. गोळीबार नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. बेकायदा रिव्हॉल्व्हर आले कुठून? पोलिसांकडून तपास या घटनेत वापरण्यात आलेले रिव्हॉल्व्हर बेकायदा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शैलेश गुल्हाने याच्याकडे हे शस्त्र आले कुठून, त्याने ते कोणाकडून मिळवले आणि किती दिवसांपासून स्वतःजवळ ठेवले होते, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच या शस्त्राचा यापूर्वीही वापर करण्यात आला होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत. रिव्हॉल्व्हरमध्ये आधीपासून गोळ्या लोड होत्या का, दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करताना नेमकी कोणती प्रक्रिया घडली आणि अर्जुनच्या दिशेने शस्त्र रोखले असताना ट्रिगर कसा दाबला गेला, याचीही चौकशी केली जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस घटनेचा घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेले तरुण, तर दुसरीकडे दारूच्या नशेत बेकायदा शस्त्राचा केलेला वापर, यातून ही गंभीर घटना घडली. केवळ शस्त्राचा रुबाब दाखवण्याच्या प्रयत्नात एका अल्पवयीन मुलाला जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. सध्या अर्जुनच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, या प्रकरणातील शस्त्राचा स्रोत आणि गोळीबारामागील नेमकी परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. हेही वाचा…. ‘अदानी ग्रीन एनर्जीला ब्लॅकलिस्ट करून तारळी प्रकल्प रद्द करा’:सयाजी शिंदेंचा एल्गार, थेट पोवाडा गात सरकारवर साधला निशाणा विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियम आणि महसुली कायद्यांना हरताळ फासला जात असेल, तर त्याची किंमत शासन आणि स्थानिक जनतेने का मोजायची? असा सवाल उपस्थित करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाटण तालुक्यातील तारळी उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढा उभारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच “लई झाली आता दिरंगाई, कुणाकुणावर करणार कारवाई?” असा एक पोवाडा सादर करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा…..
Source link
नागपुरात दारूच्या नशेत डीजे व्यावसायिकाचा गोळीबार:17 वर्षीय मुलाच्या डोक्यात घुसली गोळी, प्रकृती गंभीर