![]()
कर्जत तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीतून बळीराजाची सुखरूप सुटका व्हावी आणि राज्यभर पावसाचे आगमन व्हावे, यासाठी मिरजगाव येथील मुस्लिम समाजबांधवांनी सलग तीन दिवस सामूहिक नमाज पठण करून प्रार्थना केली. ईदगाह मैदानावर एकत्र येत ‘निसर्गराजाने कृपा करावी, पाऊस पडावा आणि दुष्काळ दूर व्हावा, अशी दुवा करण्यात आली. शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्यावरच समाजातील प्रत्येक घटकाचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे बळीराजा सुखी तर समाज सुखी, ही भावना मनात ठेवून मुस्लिम बांधवांनी शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली. शेतकऱ्यांचा आधार असलेले गाई, बैल, शेळ्यांसह पशुधन जगावे, त्यांना मुबलक पाणी व चारा मिळावा, तसेच रानावनातील पशुपक्ष्यांनाही अन्न-पाणी उपलब्ध व्हावे, यासाठीही नमाज अदा करण्यात आली. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे नवे संकट उभे ठाकले आहे. पीक हातातून गेले तर कर्जफेडीचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत काळ्या आईची ओटी भरण्यासाठी पुन्हा उभा राहतो. त्याच्या या संघर्षाला बळ मिळावे, यासाठी मुस्लिम समाजबांधवांनी प्रार्थनेचा मार्ग स्वीकारला. शेतकरी केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अन्नधान्य पिकवतो. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत उभे राहणे ही सामाजिक बांधिलकी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सलग तीन दिवस ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली. यावेळी मिरजगावमधील मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसासाठी करण्यात आलेल्या या सामूहिक प्रार्थनेतून ‘बळीराजा सुखी तर समाज सुखी’ हा संदेश देण्यात आला.
Source link
पावसासाठी मुस्लिम बांधवांची तीन दिवस ‘दुवा’:मिरजगावच्या ईदगाहमैदानावर नमाज पठण