Headlines

मुलांनो, मोबाइलच्या दुनियेतून बाहेर या; मैदानावर घाम गाळा!:क्रीडा अधिकारी खुरंगे यांचे प्रतिपादन, मिरजगावात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सुरू




यशासाठी नियोजन आणि शिस्त महत्त्वाची आहे. आजची तरुणाई मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. या आभासी दुनियेत अडकण्यापेक्षा मैदानावर उतरून खेळाला प्राधान्य द्या. शेतकरी जसा सातत्याने कष्ट व योग्य नियोजन करून उत्पादन घेतो, त्याचप्रमाणे खेळाडूंनीही सराव, मेहनत आणि नियोजनातून कौशल्य विकसित करावे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कुस्ती, वजनउचल व शरीरसौष्ठव क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चा शुभारंभ मंगळवारी येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयात झाला. दहा जिल्ह्यांतील सुमारे १५ शासकीय कृषी व संलग्न महाविद्यालयांसह ६५ हून अधिक विनाअनुदानित महाविद्यालयांतील सुमारे ३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे व कर्जतचे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी प्रास्ताविकात यजमानपद मिळणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शिक्षणासोबत शरीर, मन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कुस्तीतील खाशाबा जाधव यांच्या १९५२च्या ऑलिम्पिक कांस्यपदकाचाही त्यांनी उल्लेख केला. पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी ज्ञान आणि शारीरिक शक्तीचा योग्य समन्वय यशासाठी आवश्यक असल्याचे सांगत मोबाईलचा वापर ज्ञानासाठी करावा, मात्र अतिरेक टाळावा, असे आवाहन केले. संस्थेचे सचिव राजेंद्र गोरे यांनी खेळाडूंनी नियम व शिस्त पाळून खिलाडूवृत्ती जपावी, असे सांगितले. संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे यांनी महाविद्यालयाने नुकत्याच झालेल्या मानांकनात ‘अ’ दर्जा मिळवल्याचे सांगत विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात चमकतील, असा विश्वास व्यक्त केला. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे. ‘अ’ दर्जामुळे महाविद्यालयाची भरारी सद्गुरू कृषी महाविद्यालयाने नुकत्याच झालेल्या मानांकनात ‘अ’ दर्जा मिळवला. शिक्षणासोबत क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालयाची वाटचाल सुरू असल्याचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *