![]()
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून एक १५ वर्षाचा मुलगा ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता. २६ घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील आनंद नागोराव जाधव (१५) व कमलबाई नरवाडे (५०) हे दोघे नेहमी प्रमाणे आज सकाळी शेळ्या चारण्यासाठी नदीच्या काठावरील शिवारात गेले होते. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास विजेचा कडकडाट सुरु झाला. त्यामुळे ते शेळ्या घेऊन घराकडे निघाले होते. यावेळी काही अंतरावर आल्यानंतर अचानक आनंद याच्या अंगावर विज कोसळली त्यामुळे तो जागीच कोसळला. तर कमलबाई ह्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, गावालगत शिवारात विज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता आनंदा खाली पडलेला दिसून आला तर कलमबाई भाजलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर आनंद याचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या कमलबाई यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मयत आनंद हा घरी एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडिल, एक बहिण असा परिवार असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
Source link
पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून 15 वर्षाचा मुलगा ठार:एक महिला गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले