![]()
पुणे गुन्हे शाखेने ‘मकोका’ कारवाईनंतर चार महिन्यांपासून पसार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय 32, रा. काकडे वस्ती, कोंढवा, मूळ रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.निकाळजेवर खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, लूटमार आणि वाहन चोरी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करून त्याला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.कोंढवा परिसरात एका व्यक्तीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याप्रकरणी निकाळजे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर तो फरार झाला होता आणि गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.पोलिस कर्मचारी शशिकांत नाळे आणि राहुल ढमढेरे यांना तो छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचून त्याला अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलिस निरीक्षक संदीपान पवार, उपनिरीक्षक अभिजित पवार, विनोद शिवले, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, उमाकांत स्वामी, अमर चव्हाण, अकबर शेख, अविनाश इंगळे, सुधीर सोनवणे, नैत्रिका अडसूळ आणि मयुरी पालवे यांनी ही कारवाई यशस्वी केली. सदनिकेतून पाच लाखांचा ऐवज चोरी सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना बाणेर परिसरात घडली.याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे कुटुंबियांसह बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील व्हेलेन्सिया सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार व्यावसायिक सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे असा पाच लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक एस रायकर तपास करत आहेत.
Source link
पुणे पोलिसांची मोठी कारवाई:‘मकोका’ लागलेला सराईत गुन्हेगार अजय निकाळजे छत्रपती संभाजीनगरमधून अटक!