![]()
पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळील इंदोली फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबारामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. व्यावसायिक व्यवहारातील पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी संतोष घोलप यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात घोलप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ चव्हाण आणि संतोष घोलप यांच्यात काही दिवसांपासून व्यावसायिक व्यवहारातील पैशांच्या हिशोबावरून वाद सुरू होता. शनिवारी मध्यरात्री इंदोली फाटा परिसरात दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात चव्हाण यांनी पिस्तूलातून घोलप यांच्यावर थेट गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. व्यावसायिकाची प्रकृती गंभीर या गोळीबारात संतोष घोलप यांच्या मांडीत आणि पोटात गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झाल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना घटनेची माहिती मिळताच उंब्रज आणि कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपी सोमनाथ चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना केली आहेत. कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित राष्ट्रीय महामार्गासारख्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर आणि तेही एका लोकप्रतिनिधीवर गोळीबाराचा आरोप झाल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. हे ही वाचा… भरधाव कारचा भीषण अपघात:झाडावर धडकून एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी, सातारा–कास मार्गावरील घटना सातारा–कास मार्गावरील एकीव फाटा परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने एक जण गंभीर, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. सविस्तर वाचा…
Source link
पुणे–बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबार:कालगावच्या सरपंचाकडून व्यावसायिकावर हल्ला, पैशांच्या वादातून गोळ्या झाडल्याचा आरोप